दिवसेंदिवस लोकप्रिय क्रेडिट कार्डवर मिळणारे फायदे कमी होत आहेत. काही बेसिक कार्डस्मध्ये विमानतळांवरील मोफत लाउंज प्रवेश बंद करण्यात आला आहे. काही कार्डमध्ये त्रैमासिक, मासिक आधारावर ठराविक रक्कम खर्च केल्यानंतरच विनामूल्य लाउंज प्रवेश मिळतोय. त्याचप्रमाणे काही कार्डवर रिवॉर्ड पॉइंट्सबाबतचे नियम बदलले आहेत तर काही ठिकाणी एअर माईल कमी करण्यात आलंय. आकर्षक फायदे आणि रिवॉर्डच्या मोहापायी तुम्ही क्रेडिट कार्ड घेतलंय किंवा नवीन कार्ड घेण्याचा विचार करत असल्यास क्रेडिट कार्डमध्ये झालेल्या अवमूल्यन किंवा डिव्हॅल्युएशनबद्दल माहिती करून घ्या. डिव्हॅल्युएशनचे होण्याची काय कारणं आहेत ? आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो, पाहूयात.
कार्ड डिव्हॅल्युएशन म्हणजे काय ? क्रेडिट कार्डपासून मिळणारे फायदे कालातरानं कमी होत असल्यास त्याला कार्डचे डिव्हॅल्यूएशन असे म्हणतात. बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनी कार्डच्या अटी, रिवॉर्ड प्रोग्राम किंवा शुल्काशी संबंधित नियम बदलल्यानंतर डिव्हॅल्यूएशनला सुरूवात होते. त्यामुळे कार्डधारकाला कमी फायदे मिळतात. फायदे मिळवण्यासाठी ग्राहकांना स्वतः खर्च करावा लागतो. खर्च केल्यानंतरच ग्राहकांना सर्व फायदे मिळतात. नुकतंच अॅक्सिस आणि एचडीएफसी बँकेनं क्रेडिट कार्ड्सची फीचर्स कमी केली आहेत.
उदाहरणार्थ HDFC बँकेने Regalia क्रेडिट कार्डच्या काही नियमात बदल केलाय. लाऊंज प्रवेशाबाबत आतापर्यंत Regalia क्रेडिट कार्डमध्ये कोणत्याही अटी आणि नियम नव्हत्या. मात्र, 1 डिसेंबरपासून काही अटी पूर्ण केल्यानंतरच लाउंजमध्ये प्रवेश मिळणार आहे. तीन महिन्यात किमान 1 लाख रुपये खर्च करणाऱ्या ग्राहकांनाच लाऊंजचा फक्त दोन वेळेसच लाभ घेता येणार आहे. SBI Card नं SBI cashback credit card वर मोफत लाऊंज सुविधा बंद केलीय.
या वर्षी सप्टेंबर महिन्यात अॅक्सिस बँकेने मॅग्नस क्रेडिट कार्डच्या नियमात बदल केलाय. वार्षिक शुल्क 10,000 रुपयांवरून 12,500 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसंच 1 लाख रूपयाच्या मासिक खर्चावर 25,000 EDGE रिवॉर्ड पॉइंट्सचा लाभ बंद करणे यासारख्या अटींचा समावेश आहे.
अशा प्रकारे अनेक क्रेडिट कार्डवरील फायदे कमी करण्यात आले आहेत. क्रेडिट कार्डचे फायदे कमी का करण्यात आले ? हे जाणून घेऊया. कोरोंनानंतर बदलेल्या आर्थिक परिस्थितीचे हे द्योतक आहे. विशेषतः महागाईत सतत वाढत होत असल्यानं वस्तू आणि सेवांच्या किमतीत सतत वाढ होत आहे. उत्पादन खर्च वाढल्यानं क्रेडिट कार्ड कंपन्यांना रिवॉर्ड प्रोगामं राबवणं कठीण जात आहे,असं तज्ज्ञांनी माहिती दिलीय.
दोन वर्षांपूर्वी बँका विमानतळावरील लाउंजसाठी प्रती व्यक्ती 600 रुपये सरासरी खर्च करत होत्या. 2023 च्या जुलै-सप्टेंबर त्रैमासिकात सरासरी 990 रुपये खर्च करावा लागत आहे. म्हणजेच दोन वर्षात लाऊजच्या खर्चात 65 टक्क्यांनी वाढ झालीय,अशी माहिती DreamFolks या कंपनीनं दिलीय.
वाढत्या हवाई प्रवासामुळे बँकांसमोर मोफत लाउंज प्रवेशाचं आर्थिक आव्हान उभं राहिलंय.क्रेडिट कार्ड नियमितपणे न वापरणारे ग्राहकसुद्धा विनामूल्य लाउंज सुविधेचा लाभ घेत आहेत. नियमितपणे क्रेडिट कार्ड न वापरणाऱ्या ग्राहकांकडून बँकांना उत्पन्न देखील मिळत नाही. त्याचमुळे बँकांनी खर्चाची मर्यादा निश्चित केलीय. त्यामुळे एका मर्यादेपर्यंत खर्च केल्यानंतर ग्राहकांना एका ठराविक मर्यादेतच मोफत लाऊंजची सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App