Health Insurance घेताना या पाच बाबी आहेत महत्वाच्या

आरोग्य विमा घेताना या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे.

  • Team Money9
  • Last Updated : December 7, 2023, 18:52 IST

खासगी कंपनीत नोकरी करणारे मोहन आरोग्य विमा घेण्याच्या विचारात आहेत. कुटुंबात नवरा-बायको आणि दोन मुलं आहेत. नक्की कोणता विमा घ्यावा ? किती कव्हर असावं . तसेच सर्व सदस्यांसाठी वेगवेगळा विमा घ्यावा की फॅमिली फ्लोटर प्लॅन घ्यावा ? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर न मिळवता कोणताही विमा घेण्यात शहाणपणा नाही. सध्या आरोग्य विमा विकणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. दररोज एक नवीन पॉलिसी बाजारात येत आहे. आपल्यासाठी कोणती पॉलिसी योग्य आहे ?असा प्रश्न मोहनप्रमाणेच सर्वांनाच पडलाय.

कोणती पॉलिसी योग्य आहे ? आणि योग्य पॉलिसी कशी निवडावी ? हे पाहूयात. या पाच बाबी विचारात घेऊन तुम्ही आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करू शकता.

किती कव्हर असावं ?

आरोग्याशी संबंधित खर्चामध्ये दुप्पटीहून अधिक वाढ झालेली दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर हा 5.02 % होता. आरोग्य महागाई 14 % वर आहे. आरोग्य महागाई वाढल्यानं लहान मोठ्या आजारांसाठी लाखों रुपयांचा खर्च होत असल्यानं कुटुंबासाठी पुरेसे कव्हर घेणे महत्वाचे आहे. उपचारांच्या वाढता खर्च पाहता एखाद्या लहान शहरात तुम्ही राहात असल्यास प्रती व्यक्ती 10 लाख रुपयांचे कव्हर घ्या. मोठ्या शहरामध्ये राहत असल्यास 20 लाख रुपयांचा आरोग्य विमा घ्या.

कोणती विमा पॉलिसी खरेदी करावी? :
आरोग्य विम्यामध्ये वैयक्तिक आणि फॅमिलि फ्लोटर या दोन प्रकारातून विमा संरक्षण मिळते. मोहन यांना कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपयांचा आरोग्य विमा घेणं परडवणारे नाही. त्यामुळे त्यांना फॅमिली फ्लोटर प्लॅन घेणे फायद्याचे ठरेल. मोहन यांनी 10 लाख रुपयांचा फॅमिलि फ्लोटर प्लान घ्यावा.  गरजेनुसार कोणत्याही सदस्यावर 10 लाख रुपयांपर्यंत खर्च करता येते. मोहन यांनी पत्नीच्या उपचारासाठी तीन लाख रुपये खर्च केल्यास. उर्वरित सदस्य सात लाख रुपयांपर्यंत उपचार घेऊ शकतात.

 तुम्ही कुठं राहता ? :
लहान शहरांच्या तुलनेत मोठ्या शहरांमध्ये उपचारांचा खर्च जास्त आहे. उदाहरणार्थ डेंग्यूच्या उपचारासाठी रत्नागिरीमध्ये पन्नास हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. तर मुंबईमध्ये डेंग्यूच्या उपचारासाठी एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. विमा कंपन्या शहरानुसार आरोग्य विम्याचा हप्ता ठरवतात. लहान शहरांमध्ये आरोग्य विम्याचा हप्ता हा 20 ते 30 टक्के कमी असतो. रत्नागिरीतल्या विमाधारक मुंबईमध्ये उपचार घेतल्यानंतर पूर्ण दावा मंजूर होत नाही. उर्वरित 20 ते 30 टक्के रक्कम स्वतःच्या खिशातून भरावी लागते.

रूम रेंट कॅपिंग :
हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर रूम रेंटचा खर्च मोठा असतो. बेसिक आरोग्य विम्यात रूम भाडं समइंश्योर्डचा 1 % एवढा असतो.  3 लाख रुपयांची पॉलिसी असल्यास रूम रेंट 3000 रुपये प्रती दिवसांच्या हिशोबाने मिळतो. जर रूमचं भाडे 5000 रुपये असल्यास उर्वरित 2 हजार रुपये तुम्हाला भरावे लागतात. अशा प्रकारचा को-पेमेंट क्लॉज असल्यास विमा कंपन्या संपूर्ण दावा मंजूर करत नाहीत.  बिलातील एक ठराविक रक्कम तुम्हाला स्वतः भरावी लागते. को-पेमेंट क्लॉजमुळे पॉलिसीचा हप्ता कमी होत असला तरीही अशी पॉलिसी घेणे टाळावे.

रिस्टोरेशनची सुविधा :

आरोग्य महागाईमुळे 5 ते 10 लाख रुपयांचा खर्चाचा विमा कव्हर केंव्हा संपतो ते कळत नाही. आजकाल अनेक विमा कंपन्या आरोग्य योजनांमध्ये रिस्टोरेशनची सुविधा देत आहेत.पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा असताना सहा लाख रुपये उपचारासाठी खर्च झाल्यास. अशा परिस्थितीत विमा कंपन्या तुमच्या पॉलिसीमध्ये 5 लाख रुपयांचा सम इंश्योर्ड जोडतात. यालाच रिस्टोरेशन सुविधा असे म्हणतात.  बहुतांश विमा कंपन्या वर्षातून तीन वेळेस सम इंश्योर्ड रकमेएवढी रिस्टोरेशनची सुविधा देतात. नाममात्र हप्ता भरून तुम्हाला आरोग्य विम्याचे संरक्षण तीन पट वाढवता येते. मात्र, काही अटींची पूर्तता केल्यानंतर रिस्टोरेशन सुविधेचा फायदा घेता येतो. तुमच्याकडे पुरेसे पैसे असल्यास वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी घेणं फायद्याचं आहे . पैशांची अडचण असल्यास फॅमिली फ्लोटर प्लॅन घ्या,असा सल्ला कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ बलवंत जैन यांनी दिलाय.

विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशिओ आणि कॅशलेस हॉस्पिटलचं नेटवर्कची यादी पाहिल्यानंतरच आरोग्य विमा खरेदी करा. तसेच तुमच्या घराजवळील चांगल्या हॉस्पिटल्सचा पॉलिसीच्या नेटवर्कमध्ये समावेश असणं कधीही फायदेशीर असतं. चांगल्या आरोग्यासाठी आरोग्य विमा खूप महत्त्वाचा आहे. जेवढ्या लवकर तुम्ही आरोग्य विमा घ्याल तेवढा तुमचा फायदा आहे. आर्थिक अडचणींमुळे मोठे कव्हर घेणं शक्य नसल्यास सुरुवातीला लहान रक्कमेचा आरोग्य विमा घ्या. उत्पन्न वाढल्यानंतर कव्हरमध्ये वाढ करता येतं.

Published: December 7, 2023, 18:52 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App