क्रेडिट स्कोअर कमी असल्यास कर्ज मिळवण्याचे पर्याय कोणते ?

699 पेक्षा कमी क्रेडिट स्कोअर असल्यास कर्ज मिळवताना अडचणी येतात.

  • Team Money9
  • Last Updated : January 22, 2024, 15:17 IST
क्रेडिट स्कोअर कमी असल्यास कर्ज मिळवण्याचे पर्याय कोणते ?

राघवला पैशांची अत्यंत गरज आहे म्हणून त्याने बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला. मात्र,क्रेडिट स्कोअर कमी असल्यानं बँकेनं कर्ज नामंजूर केलं.आता काय करावं ? या चिंतेनं राघवची झोप उडालीय तुमचाही क्रेडिट स्कोअर कमी असल्यास तुम्हालाही कर्ज मंजूर होत नाही. क्रेडिट स्कोअरमध्ये तुमच्या कर्ज घेतल्याचा आणि परतफेडीचा इतिहास असतो. 300 से 900 दरम्यान क्रेडिट स्कोअर असतो. 700 ते 900 क्रेडिट स्कोअर हा चांगला असतो आणि कर्जही कमी व्याज दरात मिळतं. तर 699 पेक्षा कमी क्रेडिट स्कोअर असल्यास कर्ज मिळवताना अडचणी येतात.

मात्र,क्रेडिट स्कोअर कमी असतानाही कर्ज मिळू शकतं. मात्र,त्यासाठी काही पर्यायांचा वापर करावा. बँकेला तुम्ही तुमच्या उत्पन्नातून सहज कर्जाचा हप्ता भरू शकता हे पटवून द्या. तुमच्या पगारात वाढ झालेली असल्यास किंवा उत्पन्नाचं एखादं नवीन स्रोत असल्यास त्याची माहिती बँक किंवा NBFC ला द्या. माहितीची सत्यता पडताळल्यानंतर तुम्हाला कर्ज मंजूर होतं. आर्थिक संस्थेला नोकरी आणि उत्पन्नाची शाश्वती पटवून दिल्यास पर्सनल लोन मंजूर होतं. मात्र, कर्जाचा व्याज दर हा जास्त असतो.

दुसरा पर्याय म्हणजे लहान कर्जासाठी अर्ज करा. क्रेडिट स्कोअर चांगला नसल्यास बँकेला कर्ज परतफेडीची शंका वाटते त्यामुळे मोठं कर्ज मिळताना अडचणी येतात. अशावेळी कमी रक्कमेच्या कर्जासाठी अर्ज करा. कमी रक्कमेचं पर्सनल लोन लवकर मंजूर होतं. तसेच कर्जदाराच्या अर्जात सहकर्जदार जोडा किंवा हमीदार म्हणजेच गॅरंटर जोडा.

को-अप्लीकंट म्हणजेच सहकर्जदार किंवा गॅरंटर दिल्यानं कमी क्रेडिट स्कोअर असला तरीही कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते. एखादी वस्तू गहाण ठेऊन देखील तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता. उदाहरणार्थ सोनं, बँकेतील एफडी, म्युच्युअल फंड किंवा एखादी प्रॉपर्टी गहाण ठेऊन देखील तुम्हाला कर्ज मंजूर होतं.

घर गहाण ठेऊन कर्ज घेताना घराची सर्व मूळ कागदपत्रं बँकेकडे जमा करावे लागतात. कर्ज परतफेड केल्यानंतर कागदपत्रं परत मिळतात. कर्ज बुडवल्यास बँक घराचा लिलाव करून कर्जाची वसुली करते. त्यामुळे घर गहाण ठेऊन कर्ज घेताना दहा वेळा विचार करा.

Published: January 22, 2024, 11:55 IST