स्वप्नातले घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती ?

2024 मध्ये देखील घरांच्या मागणीमध्ये वाढ कायम राहणार आहे,असा अंदाज बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवलाय.

  • Team Money9
  • Last Updated : January 18, 2024, 14:43 IST
स्वप्नातले घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती ?

हे आहेत दिलीप. एका नामांकित कंपनीमध्ये काम करतात आणि चांगले कमावतात देखील. गेल्या एका वर्षापासून ते घर खरेदी करण्याचे नियोजन करत आहेत. कधी घरांच्या वाढत्या किंमती तर कधी वाढते व्याजदर यामुळे घर खरेदीचा निर्णय घेणं टाळतात . ड्रीम होम कधी खरेदी करावं ? यावरून त्यांचा गोंधळ आता वाढला आहे. घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती ?असे अनेक प्रश्न त्यांना पडले आहेत

सध्या घरांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तसेच गृहकर्जाचा व्याज दरही वाढलाय. अशावेळी घर खरेदीसारखा मोठा आर्थिक निर्णय घेणं आव्हानात्मक असतं. घर खरेदीची योग्य वेळ कोणती ?असा प्रश्न दिलीपसारख्या अनेकांना पडला आहे. घर खरेदीसाठी कोणताही असा ठराविक नियम नाहीये. पण काही असे काही घटक आहेत ज्यामुळे तुमचे ड्रीम होमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या घटकांचा आधार घेऊन तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. आता या घटकांबद्दल माहिती पाहूयात.

प्रत्येक बाजार हा चक्राकार असतो. कधी बाजारात तेजी असते तर कधी मंदी नमकं असंच रिअल इस्टेट मार्केटमध्येही तेजी आणि मंदीचं चक्र सुरू असतं. या चक्राकार परिस्थितीत घरांच्या किमती काही काळासाठी स्थिर असतात किंवा कमी असतात. या कालावधीत किफायतशीर दरात घर खरेदी करण्याची संधी असते. 2013 ते 2020 पर्यंत जवळपास सात वर्ष रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून म्हणजेच 2022 आणि 2023 पासून घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यात.

2023 मध्ये भारतातल्या प्रमुख सात शहरांमध्ये मागणी वााढल्यानं घरांच्या किमतीमध्ये वार्षिक आधारावर 10 ते 24 टक्के तेजी पाहायला मिळाली.हैदराबादेत घरांच्या किमतीत सर्वाधिक 24 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती प्रॉपर्टी कॅन्सल्टन्सी अॅनरॉकच्या अहवालातून मिळतेय.

आतापर्यंत आपण 2023 ची आकडेवारी पाहिली आता 2024 ची आकडेवारीवर नजर टाकूयात. 2024 मध्ये देखील घरांच्या मागणीमध्ये वाढ कायम राहणार आहे,असा अंदाज बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवलाय. तसेच घरांच्या किंमतीमध्ये 10 ते 12 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. मागणी वाढल्यानं घरांच्या किमतीतील तेजी दोन ते तीन वर्ष कायम राहू शकते. त्यामुळे सध्या घर खरेदी करणं फायद्याचं आहे. घर खरेदीचा निर्णय प्रलंबित ठेवल्यास घरांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यताच जास्त आहे.

घर खरेदीमध्ये व्याज दर हा दूसरा महत्वाचा घटक आहे. घर खरेदी करताना गृह कर्ज दीर्घ कालावधीसाठी घेतलेलं असतं. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 च्या दरम्यान रेपो रेटमध्ये अडीच टक्के वाढ केली आहे. रेपो दर वाढल्यानं सात टक्क्यांपेक्षा कमी असणारे गृहकर्जाचे व्याज दर आता साडे आठ ते दहा टक्क्यांवर आलेत. गेल्या पाच वळेस आरबीआयनं रेपो दर स्थिर ठेवले आहेत.

महागाई आता नियंत्रणात आहे. महागाई वाढण्याची शक्यता देखील कमी आहे. त्यामुळे आरबीआय दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच जून-जुलै दरम्यान रेपो दर कमी करू शकते. त्यामुळे काही बँकांनी गृहकर्जाचे व्याज दर देखील कमी केले आहेत. 2024 मध्ये रेपो दरात अर्धा ते सव्वा टक्क्यांपर्यंत कपात होऊ शकते. रेपो दर कमी झाल्यास गृहकर्जाचा हप्ताही कमी होऊ शकतो.घरांच्या किंमती आणि व्याजाचे दर हे दोन घटक तुमच्या नियंत्रणाबाहेरील आहेत. घरांच्या वाढत्या किंमती आणि वाढते व्याज दर अशावेळी नवीन घर खरेदी करणाऱ्यांनी काय करावं ? याविषयी तज्ज्ञ काय म्हणतायेत ते पाहू

घर खरेदी करताना असे काही महत्वाचे घटक : 

गृहकर्जामुळेच अनेकाचं घर खरेदीचं स्वप्न पूर्ण होतं. मात्र, बँक शंभर टक्के कर्ज देत नाही, याची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. बहुतांश बँका घरांच्या किमतीच्या 70 ते 80 टक्के कर्ज देतात. जवळपास 20 ते 30 टक्के रक्कम तुम्हाला स्वत: भरावी लागते. त्यालाच डाऊन पेमेंट असे म्हणतात. डाऊनपेमेंट असेल तरच घर खरेदीचं स्वप्न पाहा. डाऊन पेमेंट जास्त केल्यास कर्जाचं ओझं कमी होतो.

घर खरेदी करणे हा दीर्घ कालावधीचा मोठा आर्थिक सौदा आहे. तुम्ही खूप मोठा काळ म्हणजेच जवळपास 20 ते 30 वर्षापर्यंत गृहकर्जाचा हप्ता भरावा लागणार आहे. एवढा मोठया काळात कोणत्याही अडचणीशिवाय कर्जाचा हप्ता भरू शकता की नाही ? याचा विचार करा. तुमचा पगाराचा मोठा भाग हा कर्जाच्या हप्तात जातो. कर्जाचा हप्ता तुमच्या हाथात पडणाऱ्या पगाराच्या 30 ते 40 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. उत्पन्नापेक्षा कर्जाचा हप्ता जास्त असल्यास अनेक तोटे आहेत. घराचा हप्ता जास्त असल्यास मुलांच्या शिक्षणाबाबत तडजोड करावी लागते. हप्त्यामुळे बचत करता येत नाही. हप्ता जास्त असल्यास एखाद्यावेळी बचत सुद्धा तोडावी लागते.
बचत का मोडावी लागते ? हे मनी 9 च्या पर्सनल फायनान्स सर्व्हेक्षणामधून देखील समोर आले आहे.

मनी 9 च्या पर्सनल फायनान्स सर्व्हेक्षणात तब्बल 35 हजारपेक्षा अधिक कुटुंबांचा समावेश करण्यात आला होता. गेल्या 5 वर्षात 67 % भारतीय कुटुंबांना आपली बचत मोडावी लागली. तसेच 8.2 % कुटुंबांनी कर्ज फेडण्यासाठी आपली बचत मोडल्याचं सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे गृहकर्ज असो वा वैयक्तिक कर्जाचा हप्ता कमी ठेवा. हप्ता कमी असल्यास आवश्यक खर्च , बचत आणि गुंतवणूक करताना कोणतीही अडचण येणार नाही. घर खरेदी करण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर किंवा सीबील स्कोअर नक्की पाहा. क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास कमी व्याज दरात कर्ज मिळू शकतं. सीबील स्कोअर चांगला असल्यास बँकेला कमी व्याज दरात कर्ज देण्यास विनंती करू शकता. खराब क्रेडिट स्कोअरच्या तुलनेत चांगला क्रेडिट स्कोअर असणाऱ्या कर्जदाराला एक टक्के कमी व्याज दरात कर्ज मिळते. कर्ज परतफेडीच्या संपूर्ण कालावधीत व्याज दरातील कमी फरक असला तरीही तुमचे खूप पैसे वाचतात. 750 पॉईंट पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर हा चांगला मानला जातो.

या घटकांवर लक्ष दिल्यास घर खरेदीचा योग्य काळ कोणता याची तुम्हाला माहिती मिळते. आर्थिक दृष्या तुम्ही किती सक्षम आहात हे सर्वात महत्तवाचं आहे. तुमच्याकडे डाऊनपेमेंटसाठी पैसे असतील आणि वेळच्यावेळी तुम्ही घराचा हप्ता भरू शकत असाल  तर घर खरेदी करण्याचा निर्णय घ्या.तुम्ही आर्थिक सक्षम असाल तर व्याज दर आणि घरांच्या किमतीचा परिणाम फारसा जाणवत नाही.

Published: January 18, 2024, 12:20 IST