क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी आणखी तीन दिवस

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

बातमीपत्राच्या सुरूवातीला HDFC बँकेची बातमी
HDFC बँकेनं नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना आता 90 दिवसांऐवजी 30 दिवसांची नोटीस द्यावी लागणार आहे. या नियमामुळे बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जास्त स्वातंत्र्य देण्यात आलंय.

2025 पर्यंत जपानला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था जगातील चवथी मोठी अर्थव्यवस्था होऊ शकते,असा अंदाज नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी वर्तवलाय. सध्या अमेरिका,चीन,जर्मनी आणि जपाननंतर पाचव्या क्रमाकांवर भारताची अर्थव्यवस्था आहे. 2022 मध्ये ब्रिटनला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहचली. दहा वर्षापूर्वी भारताची अर्थव्यवस्था जगात अकराव्या क्रमाकांवर होती. सध्या भारताचा जीडीपी 3.7 लाख कोटी अमेरिकन डॉलर एवढा आहे.

आता बातमी कांद्याची
कांद्याच्या दरातील चढ-उतार कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं यावर्षी बफर स्टॉकसाठी पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचं नियोजन केलंय. 2024-25 या वर्षासाठी बाजारातील दरानुसार शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला जाणार आहे. कांद्याचे दर वाढल्यानंतर बफर स्टॉकमधील कांदा केंद्र सरकार बाजारात आणते त्यामुळे कांद्याच्या दर प्रमाणापेक्षा जास्त वाढत नाहीत.

आता बातमी सोन्याची
सोन्याचे दर वाढल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी एप्रिल महिन्यात गोल्ड ETF मधून 398 कोटी रुपये काढून घेतले आहेत. मार्च महिन्यातही गुंतवणूकदारांनी 266 कोटी रुपये काढले . गुंतवणूकदार नफा कमावत असले तरीही गोल्ड ETF च्या एकूण AUM पाच टक्क्यानं वाढून
32 हजार 789 कोटी रुपये झाली,अशी माहिती म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना असलेल्या ऍम्फीनं दिलीय

क्रेडिट कार्ड ग्राहकांच्या हित साधलं जावं तसेच व्यवहारात पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी आरबीआयनं क्रेडिट कार्डशी संबंधित काही नियमांमध्ये बदल केलाय. क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी ग्राहकांना ड्यू डेटनंतरही तीन दिवस अतिरिक्त मिळणार आहेत. म्हणजेच तीन दिवस उशिरा बिल भरलं तरीही तुम्हाला दंड द्यावा लागणार नाही. तसेच ग्राहक त्यांच्या सोयीनुसार कार्डचं नेटवर्क निवडू शकतात. तसेच कार्ड बंद करण्यासाठी अर्ज केल्यानंतर आता सात दिवसात कार्ड बंद होणार आहे.कार्ड जारी करणाऱ्या कंपन्यांनी सात दिवसाच्या आत क्रेडिट कार्ड बंद न केल्यास कार्डधारकाला दर दिवसाला पाचशे रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागणार आहे.समजा अर्ज केल्यानंतर दहाव्या दिवशी कार्ड बंद झाल्यास कार्डधारकाला दीड हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इथंच थांबूयात पाहात राहा् मनी9 मराठी

 

Published: May 13, 2024, 14:13 IST

क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी आणखी तीन दिवस