सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

 

बातमीपत्राच्या सुरूवातीला पाहूयात पुण्यातील रिअल इस्टेट संदर्भातील बातमी

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांत यंदा गेल्या आठ वर्षातील उच्चांक नोंदवण्यात आलाय. पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, दोन रिंगरोड,आयटी,उद्योग, आणि रोजगारांमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात रिअल इस्टेटमध्ये तेजी दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षात दोन लाख 65 हजार ६८० दस्तांची नोंदणी झालीय. या मालमत्ता व्यवहारातून साडेआठ हजार कोटी रुपयांचा महसूल शासन दरबारी गोळा झालाय.

—-

पुण्यातील कार्यालयीन जागा भाडतत्त्वावर घेण्याचे व्यवहार या वर्षात ७० लाख चौरस फुटांवर जाण्याची शक्यता आहे,असा अंदाज मालमत्ता क्षेत्रातील सल्लागार संस्था सीबीआरई इंडियानं व्यक्त केलाय. सध्या कार्यालयीन जागेच्या बाजारपेठेत पुण्याचा भारतात सहावा क्रमांक आहे. औंध, बाणेर आणि विमाननगर या परिसरात कार्यालयीन जागेला मोठी मागणी आहे.

——–
आता बातमी रामदेव बाबांची
दिशाभूल जाहिरातीप्रकरणी पतंजली आयुर्वेदाने सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली आहे. पतंजलीच्या जाहिरातील आधुनिक वैद्यक शास्त्रावर टीका करण्यात आली होती. या जाहिरातीनंतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात बाबा रामदेव आणि एमडी आचार्य बालकृष्ण यांना नोटीस बजावली होती. नोटीसला उत्तर न दिल्यानं न्यायालयाचा अपमानप्रकरणी बाबा रामदेव आणि एमडी आचार्य बालकृष्ण यांना व्यक्तिश: न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर आचार्य बालकृष्ण न्यायालयात हजर झाले आणि शपथपत्र सादर करत न्यायालयाची माफी मागितली.

भारतातील श्रीमंत नागरिकांचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नात दिवसेंदिवस हिस्सा वाढत चालला आहे. सध्या गेल्या शंभर वर्षात वाढला नाही तेवढा वाटा श्रीमंत नागरिकांचा एकूण उत्पन्नात वाढला आहे. भारतातील एक टक्के श्रीमंत नागरिकांचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नात 23 टक्के वाटा आहे. तर समाजातील पन्नास टक्के नागरिकांचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नात फक्त पंधरा टक्के वाटा आहे,असा निष्कर्ष world inequality study या संस्थेच्या अभ्यासातून पुढे आलाय. संपत्तीच्या बाबतीतही श्रीमंत आणि गरिबांमध्ये दिवसेंदिवस दरी वाढत चालली आहे. एक टक्के टॉप नागरिकांकडे देशातील साडे 39 टक्के संपत्ती एकवटली आहे तर पन्नास टक्के नागरिकांकडे फक्त साडे सहा टक्के संपत्ती आहे. तसेच श्रीमंत नागरिक त्यांच्या संपत्तीच्या तुलनेत खूप कमी कर देतात अशी माहितीही मिळाली आहे. संपत्तीचे एकाच घटकांकडे केंद्रीकरण झाल्यास देशातील लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या संस्थांवर प्रभाव पाडून कमजोर करण्याचा धोकाही असतो असा इशाराही या अभ्यासातून देण्यात आलाय.

जगातील सर्वाधिक आनंदी देशांमध्ये फिनलँडने सलग सातव्यांदा अव्वल स्थान मिळवल आहे. नॉर्डिक देशांनी नेहमीप्रमाणे पहिल्या दहा उत्साही देशांमध्ये स्थान मिळवले आहे. फिनलँडनंतर डेन्मार्क, आईसलँड, स्विडन या देशांचा क्रमांक लागतो.भारताने मागील वर्षाप्रमाणे १२६ वा क्रमांक कायम ठेवला आहे. दुसरीकडे, २०२० मध्ये तालिबानने ताब्यात घेतलेला अफगाणिस्तान या यादीमध्ये सर्वात शेवटच्या म्हणजे १४३ व्या स्थानी आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला सोन्यासारखा दर मिळाला आहे. बुधवारी निघालेल्या हळदीच्या सौद्यात राजापुरी हळदीला ६१ हजार रुपयांचा दर मिळाला आहे. बाजार समिती स्थापन झाल्यापासून हळदीला पहिल्यांदाच एवढा दर मिळाला आहे. सौद्यात हळदीच्या दर्जानुसार किमान १५ हजार ९०० तर सरासरी ३८ हजार ४५० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. कमी पाऊस आणि गेल्या वर्षीचा साठा कमी असल्यानं हळदीच्या दर यंदा चांगलेच राहण्याची शक्यता आहे.

अमेरिकन फेडरल बँकनं सध्या व्याज दर स्थिर ठेवले असले तरीही यावर्षात पुढे व्याज दरात कपात करण्याची शक्यता असल्यानं जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्यामध्ये करण्यास सुरुवात केली आहे. सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात प्रतीतोळा एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. जळगावमध्ये सोन्याचे दर 66700 रुपयांवर पोहचला आहे. चांदीच्या दरातही किलोमागे सहाशे रुपयांची वाढ झालीय.

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इथंच थाबूया पाहात राहा मनी9 मराठी

Published: March 21, 2024, 15:25 IST

सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ