पर्यटन क्षेत्रात 5 कोटी 82 लाख नोकऱ्या निर्माण होणार

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

बातमीपत्राच्या सुरूवातीला बातमी मुंबईतल्या बांधकाम क्षेत्रातली

एप्रिलमध्ये मुंबईतील ११ हजार १६० घरांची विक्री झाली. या घरविक्रीतून राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून १०११ कोटी रुपये महसूल मिळाला. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये मुंबईतील घरविक्रीत घट झाली आहे. मार्चमध्ये १४ हजार १५४ घरांची विक्री झाली होती आणि यातून ११२२ कोटी रुपये महसूल मिळाला होता.२०२२, २०२१ च्या तुलनेत २०२४ मध्ये घरांच्या विक्रीत काहीशी घट झाली आहे. मात्र असे असले तरी २०२४ मधील ही आतापर्यंतची सर्वाधिक घरविक्री आहे. जानेवारीत १० हजार ९९७, तर फेब्रुवारीत १२ हजार ५५ घरे विकली गेली होती. मार्चमध्ये मात्र यात वाढ होऊन घरविक्रीच्या संख्येने १४ हजारांचा पल्ला पार केला. पण आता एप्रिलमध्ये यात काहीशी घट झाली असून एप्रिलमध्ये ११ हजार ६० घरांची विक्री झाली आहे.

आता बातमी नोकऱ्यांची
येत्या 9 वर्षात म्हणजेच 2033 पर्यंत पर्यटन क्षेत्रात 5 कोटी 82 लाख रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. कोरोनाकाळात म्हणजेच 2020 साली देशातील एकूण रोजगाराच्या आठ टक्के म्हणजे जवळपास 3 कोटी 9 लाख नागरिकांना नोकरी गमावण्याची नामुष्की आली होती. कोरोना महामारीनंतर आता उद्योग क्षेत्र पूर्ववत होतंय. 2023 या वर्षात पर्यटन क्षेत्रात जवळपास 16 लाख अतिरिक्त नोकऱ्या देण्यात आल्या. पर्यटन क्षेत्रात कंत्राटी रोजगारातही 14 टक्के वाढ झालीय. भाषांतरकार,छायाचित्रकार, टूर गाईड्स यासारख्या कंत्राटी नोकऱ्यांचा समावेश आहे. पुढील दोन वर्षात पर्यटन उद्योगात 20 टक्क्यांपर्यंत नोकऱ्या वाढण्याची शक्यता आहे.

ओला कॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत बक्षी यांनी रूजू झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यातच राजीनामा दिल्यानं खळबळ माजलीय. . ओलामधून दहा टक्के कर्मचारी कपातीची शक्यता आहे. ओला कंपनीचा आयपीओ येत्या काही दिवसात येणार आहे तसेच गुंतवणूकदार बँकांसोबत प्राथमिक चर्चा देखील सुरू आहे,अशावेळी बक्षी यांनी राजीनामा दिल्यानं अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
.

गूगल कंपनीनं पायथन टीममध्ये काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय. खर्चात कपात करण्यासाठी कंपनीनं कर्मचारी कपात केलीय. कंपनी अमेरिकेच्या बाहेर कमी पगारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. गुगलच्या पायथन टीममध्ये जवळपास दहा कर्मचारी काम करत होते. जर्मनीच्या म्युनिखमध्ये पुन्हा एकदा नवीन कर्मचारी नियुक्त करून टीम तयार करण्यात येणार आहे.

आता बातमी कर्जाच्या हप्त्याची

कर्ज देणाऱ्या बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणजेच NBFC व्याज वसूल करण्यासाठी अनैतिक हातखंडे वापरत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आलंय. त्यामुळे आरबीआयनं कर्ज वितरणात पादर्शकता आणा, व्याजदरासोबतच इतर शुल्काची समिक्षा करा,असे निर्देश दिलेत.

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

Published: May 2, 2024, 13:55 IST

पर्यटन क्षेत्रात 5 कोटी 82 लाख नोकऱ्या निर्माण होणार