नूतन वर्षात घर खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

गुंतवणुकीसाठी घर खरेदी करावं की राहण्यासाठी ? फ्लॅट, जमीन किंवा घर खरेदी करताना बहुतांश जण फक्त किंमत पाहतात. प्रश्न पैशाचा असल्यानं किंमत पाहायलाही हवी, मात्र, किंमत पाहताना भविष्यातील फायद्यांपासून वंचित राहू नका. तुम्ही कुठंही घर खरेदी करा. त्या भागात जवळपास काय आहे ? हे नक्की तपासा

गुंतवणुकीसाठी घर खरेदी करावं की राहण्यासाठी ? फ्लॅट, जमीन किंवा घर खरेदी करताना बहुतांश जण फक्त किंमत पाहतात. प्रश्न पैशाचा असल्यानं किंमत पाहायलाही हवी, मात्र, किंमत पाहताना भविष्यातील फायद्यांपासून वंचित राहू नका. तुम्ही कुठंही घर खरेदी करा. त्या भागात जवळपास काय आहे ? हे नक्की तपासा. यामुळे तुम्हाला सर्व सोयींचा लाभ घेत आरामशीरपणे राहता येतं. तसेच नवीन घर खरेदी करताना दुर्देवानं जुनं घर विकण्याची वेळ आल्यास चांगले पैसेही मिळतील. . चला तर मग घर खरेदी करताना आजबाजूला कोणत्या सुविधा असाव्यात
शाळा-कॉलेजजवळ घर पाहा
बहुतांश जण लग्न किंवा मुल झाल्यानंतर घर खरेदीचा निर्णय घेतात.अशा लोकांसाठी घरांच्या जवळपास चांगली शाळा-कॉलेज तसेच हॉस्पिटल राहणं खूप महत्त्वाचं आहे.नामांकित शाळा किंवा महाविद्यालयाच्या जवळपास घर महाग असतात हे तुम्हाला लक्षात येईल. शाळा-कॉलेज असलेल्या भागात घर खरेदी करणे फायद्याचं ठरतं. तसेच एखाद्या भागात शाळा-कॉलेज येणार असेल तरीही फायदा होतो. तसेच या भागात भाडेही खूप जास्त असतात.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
तुम्ही ज्या भागात घर पाहात आहात त्या भागातून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीचे अनेक पर्याय असतील तर मग सोन्याहून पिवळं. तुम्ही घर घेत असलेल्या भागात बस, मेट्रो किंवा इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे शहरातील इतर भागाशी संपर्क होत असल्यास त्या प्रॉपर्टीला प्रीमियम प्रॉपर्टी असे म्हणतात. उदाहरणार्थ मुंबईतील पश्चिम भागात रेल्वे आणि मेट्रो तसेच बेस्टची सेवा चांगली आहे. तर नवी मुंबईतल्या उरण भागात आंतरराष्ट्रीय विमानतळ, लोकल रेल्वे येत असल्यानं उरण भागातील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत. त्यामुळे या भागात भाड्यानं किंवा घर खरेदी करण्यासाठी लोकं प्राधान्य देत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच लोकल, मेट्रो किंवा शहर वाहतुकीची सुविधा असलेल्या भागात किंवा अशा सुविधा येणाऱ्या भागात घर घ्या.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्यास घरांच्या किंमती वाढतात. अन्यथा तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो.

वैद्यकीय सुविधा
बहुतांश कुटुंबात लहान मुलं आणि वृद्ध असतात. लहान मुलांना आणि वृद्ध नागरिकांना वैद्यकीय सुविधा नेहमीच गरज पडत असते. अशा परिस्थितीत हॉस्पिटलच्या जवळ घर खरेदी करा. त्यामुळे आपत्तकालिन वेळेत हॉस्पिटलच्या सुविधा तात्काळ मिळतात.
मॉल्स आणि ऑफिस स्पेस
शहरीकरणाच्या रेट्यात आठवडी बाजारांची जागा शॉपिंग मॉल्सनी घेतलीय. तर किराणा दुकानाच्या ऐवजी उच्च दर्जाचे ग्रोसरी स्टोअर उघडत आहेत. त्यामुळे तुमच्या घराजवळ शॉपिंग मॉल्स किंवा ऑफिसेस असल्यास मागणी वाढते. तसेच तुम्हाला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू,मेडिकल दुकान सहजपणे उपलब्ध होतात. अशा ठिकाणी प्रॉपर्टीचे दर वाढतच जातात.
सुरक्षितता
घर खरेदी करताना आजबाजूचा परिसर आणि सुरक्षितता खूप महत्वाची आहे. तुमच्या जीवनशैलीला अनुरूप असणाऱ्या भागात घर खरेदी करा. तुमच्यासारखेच लोकं आजबाजूला असल्यास तुम्हाला सुरक्षित वाटतं. तसेच तुम्ही घर खरेदी करत असलेला भाग सुरक्षित आहे हे नाही हेही पाहा. सरकारकडून अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा वाढीवर भर देण्यात येत आहे. संभाव्य पायाभूत सुविधा प्रकल्प होणाऱ्या भागात तुम्ही घर खरेदी केल्यास त्याभागात घरांचे दर निश्चित वाढणार. रोजगार निर्मिती देणारे प्रकल्प असतील तर ते अधिक फायदेशीर ठरते.

जुनं घर खरेदी करताना या गोष्टी ध्यानात ठेवा
जुनं घर खरेदी करताना घर किती वर्षापूर्वी बांधलं आहे हे नक्की तपासा. प्रॉपर्टीचं वय तपासण्यासाठी तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरची मदत घेऊ शकता. तसेच बांधकामाच्या दर्जाबाबतही माहिती घ्या. प्रॉपर्टीचं वय आणि बांधकामाचा दर्जा या दोन्हीचा घऱांच्या किंमतीवर परिणाम होतो.

घर खरेदी ही आयुष्यातील सर्वात मोठी घटना असते. त्यामुळे घर खरेदी करताना ठिकाण,सोयी-सुविधा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा याबाबींचा विचार करा. या वैशिष्यांमुळे तुमच्या प्रॉपर्टीची किंमत तर वाढतेच तसेच भाड्यातून चांगली कमाई करता येते. त्यामुळे घर खरेदी करताना आजबाजूचा परिसर नक्की पाहा.

Published: April 9, 2024, 13:31 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App