घर घेण्याचा विचार करताय? मग LTV रेशिओ जाणून घ्या

आपल्या प्रोफाइलसाठी बँक साधारण किती LTV रेशिओ देऊ शकते, त्याची आपण आधीच माहिती घेऊन त्यानुसार प्लॅनिंग केलं पाहिजे. यामुळे, आपल्या हातून चांगली प्रॉपर्टी जाणार नाही आणि घराचं स्वप्न नक्की पूर्ण होईल.

राहुलने स्वतःचं घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या 3 4 वर्षांपासून तो घर खरेदी करण्याचा विचार करत होता, मात्र डाउनपेमेंटसाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. आता त्याने साधारण 7 लाख रुपयाचे सेविंग्स जमा केले आहेत. मागच्या 2 वर्षात घरांच्या किमती बऱ्यापैकी वाढल्या आहेत, पण याहीपेक्षा जास्त वाढ पुढच्या 5 वर्षात होण्याची शक्यता आहे. म्हणूनच राहुलने आता वेळ वाया न घालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने पुण्यातल्या हिंजवडी भागात अनेक स्कीममध्ये एन्क्वायरी केली, अनेक प्रोजेक्ट बघितल्यावर शेवटी त्याला एक फ्लॅट आवडला. 750 स्क्वेअर फूट कार्पेट आणि 1000 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त बिल्ट एरिया असणारा फ्लॅट आपल्याला 65 लाखात मिळतोय, म्हणजे आपल्यासाठी ही डील अतिशय फायदेशीर आहे, अशी त्याला खात्री पटली. त्याने फ्लॅट बुक करण्याचा निर्णय घेतला, तसेच तिथे असणाऱ्या बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरकडून लोनची माहिती घेतली. सर तुम्हाला किमान 11 लाख रुपये डाउनपेमेंट करावं लागेल, तुम्ही केवळ 7 लाख रुपये डाउनपेमेंट केलं तर LTV रेशिओमध्ये आपली केस बसणार नाही, असं RM ने राहुलला सांगितलं. पण LTV रेशिओ म्हणजे काय आणि त्याच्या आधारे लोनची रक्कम कशी ठरते, असे प्रश्न राहुलच्या मनात आहेत, चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.

LTV म्हणजे लोन टू व्हॅल्यू रेशिओ. प्रॉपर्टी व्हॅल्यूच्या जेवढे टक्के बँक लोन देते त्या आकड्याला LTV रेशिओ म्हणतात. राहुलने 65 लाखाचा फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, पण फ्लॅटची ऍग्रिमेंट कॉस्ट आहे 60 लाख रुपये, बाकीचे 5 लाख रुपये त्याला स्टॅम्प ड्युटी आणि इतर लीगल चार्जेससाठी भरावे लागणार आहेत. ऍग्रिमेंट वॅल्यूच्या 90% रक्कम बँक लोन म्हणून द्यायला तयार आहे, म्हणजे 60 लाख रुपयाच्या प्रॉपर्टीसाठी राहुलला 54 लाखाचं लोन मिळेल आणि बाकीचे 6 लाख रुपये त्याला स्वतःच्या खिशातून भरावे लागतील. या बरोबर, स्टॅम्प ड्युटी आणि इतर लीगल चार्जेसचे 5 लाख रुपये देखील त्याला स्वतःच्या खिशातूनच भरावे लागतील. याचा अर्थ बँकेने 90 टक्याच्या LTV रेशिओनुसार हे लोन मंजूर केलं आहे. 65 लाखापैकी 11 लाख रुपयाचं काँट्रीब्युशन राहुलला करावं लागेल आणि बाकीचे 54 लाख रुपये बँक त्याला लोन देईल. मात्र, राहुलकडे आता केवळ 7 लाख रुपये आहेत, मग अश्या परिस्थितीत राहुलच्या हातातून हे डील जाईल का, हा महत्वाचा प्रश्न आहे.

राहुलने जी चूक केली तीच चूक अनेक लोक करतात. बँक साधारण प्रॉपर्टी वॅल्यूच्या 90 टक्यापर्यंत कर्ज देते. ग्राहकाची प्रोफाइल चांगली असेल तर 95 किंवा 100 टक्यापर्यंत देखील कर्ज मिळू शकतं. मात्र, ज्या वेळेला आपण बुकिंग करणार आहोत त्या वेळच्या परिस्थितीवर ते अवलंबून आहे. तुम्ही जर घर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि आपल्या हातून चांगली प्रॉपर्टी जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, तर आपल्याला 80 चा LTV रेशिओ मिळेल, या हिशोबाने प्लॅन करा. म्हणजे आपल्याला 20% डाउनपेमेंटची तयारी ठेवावी लागेल. आपण जास्त रक्कम डाउनपेमेंट म्हणून भरली तर लोनचा बोजा कमी होईल आणि कमी EMI भरावा लागेल. बँकेने आपल्याला जास्त लोन दिलं तर बाकीचे पैसे आपण बाजूला ठेऊ शकतो. या पैशाचा वापर घराचं इंटेरिअर किंवा बाकीच्या खर्चासाठी करता येईल. एकंदरीत विचार केल्यास, आपल्या प्रोफाइलसाठी बँक साधारण किती LTV रेशिओ देऊ शकते, त्याची आपण आधीच माहिती घेऊन त्यानुसार प्लॅनिंग केलं पाहिजे. यामुळे, आपल्या हातून चांगली प्रॉपर्टी जाणार नाही आणि घराचं स्वप्न नक्की पूर्ण होईल.

Published: April 5, 2024, 16:54 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App