Finfluencer च्या बोलण्यात येऊन गुंतवणूक करणे पडेल महागात

गुंतवणुकीचे धडे देणाऱ्या सोशलमीडियावरील लोकांच्या बोलण्यात येऊ नका

  • Team Money9
  • Last Updated : December 7, 2023, 16:29 IST

फिन्फ्लुएंसर्सच्या बोलण्यावर अनेक गुंतवणूकदार आंधळेपणानं विश्वास ठेवतात.  या आंधळ्या विश्वासामुळे लाखो रुपयांचे नुकसान देखील झाले आहे. फायनान्शियल एंफ्लूएंसर्सना फिनफ्लूएंसर असे देखील म्हणतात. फिनफ्लूएंसर इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब आणि X सारख्या सोशल मीडियासाइट्सवरुन शेअर बाजार, क्रिप्टो, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. सेबीनं नुकतंच फायनान्शियल एनफ्लूएंसर मोहम्मद नसीरुद्दीन अंसारी याच्यावर कारवाई केल्यानंतर अनेक जणांचे लोकांचे डोळे उघडलेत. फायनान्शियल एनफ्लूएंसर्स 3 कोर्सच्या नावाखाली , टेक्निकल चार्ट समजावण्याच्या नावाखाली फसवणूक करतात आणि पैसे देखील उकळतात. त्यामुळे शेअर बाजारातील जोखिम समजून घेऊन गुंतवणूक करा

चुकीची पद्धत आणि नियमांविरुद्ध काम केल्यानं सेबीने फायनान्शियल एनफ्लूएंसर मोहम्मद नसीरुद्दीन अन्सारी याच्यावर कारवाई केली. अन्सारी त्याच्या सोशल मीडिया हँडल “बाप ऑफ चार्ट” च्या माध्यमातून लोकांना सल्ले देत होता. पण आता सेबीने अन्सारीला शेअर बाजारात व्यवसाय करण्यास बंदी टाकलीय. अन्सारी खोटी माहिती देऊन कोर्स आणि वर्कशॉपमध्ये सामील होण्याचं आमिष दाखवत होता. सेबीनं अन्सारीला 17 कोटी 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.  SEBI कडे नोंदणी न करता अन्सारी गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करत होता. तसेच लोकांना चार्टच्या मदतीने शेअर्स खरेदी आणि विक्रीचे सल्ले देत असल्याचे SEBI च्या चौकशीत आढळून आलंय.

लोकांची दिशाभूल करून फसवणूक करणारा अन्सारी हा एकटाच फिनफ्लूएंसर नाही. चार्ट रीडिंगच्या नावाखाली हजारो फीनफ्लूएंसर्स लोकांची फसवणूक करत आहेत. ते स्वतःच चार्ट बनवतात आणि लोकांना शेअर खरेदीचा सल्ला देतात. उदाहरणार्थ एखादा शेअर 300 रुपयांचा असल्यास चार्ट दाखवून शेअर्सचा मागचा ब्रेक आऊट दाखवतात. आता शेअर्सने मल्टि इयर ब्रेक आऊट दिलाय. पंधरा दिवस हा शेअर तीनशे रुपयांवर राहील. त्यानंतर पंधरा दिवसांनी खाली जाईल. त्यानंतर 400 रुपयांपर्यंत वर जाईल.त्यामुळे शेअर खाली गेल्यानंतर खरेदी केल्यास फायदा होणार असा सल्ला देतात. त्यानंतर मागील व्हिडीओ दाखवून मागच्या वेळेस असंच घडलं होतं असं सांगतात.

अन्सारी प्रकरणावरून फिन्फ्लूएंसर्सचा वाढलेला प्रभाव दिसून येतो. “बाप ऑफ चार्ट’या YouTube चॅनेलचे 4 लाख 43 हून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. तर टेलिग्राम चॅनेलचे 53,000 सब्सक्राइबर्स आहेत. अवघ्या पाच मिनिटांत खात्रीशीर नफा कमवा, दरमहा 5 ते 10 लाख रुपयांचा खात्रीशीर परतावा मिळावा असे व्हिडीओ यूट्यूवर प्रसारित केलं जात होतं. शेअर बाजारातून झटपट आणि नियमित कमाईचं आश्वासन देण्यात येत होतं.

2020 पासून फिन्फ्लुएंसर्सनी भारतात भांडवली बाजारात प्रवेश केलाय. कोरोना महामारी आणि टाळेबंदीमुळे फिन्फ्लुएंसर्सची संख्या वाढली. बाहेर जाणं बंद होतं तसेच दररोजची दगदगही नसल्यामुळे पगारी नोकरदार शेअर बाजाराकडे आकर्षित झाले.त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.  या गुंतवणूकदारांवर गेल्या 3 वर्षांत फिन्फ्लुएंसर्सनी मोठा प्रभाव पाडलाय. फिन्फ्लुएंसर्सचे फॉलोअर्स आणि ग्राहक हे मोठ्या ब्रोकरेज फर्मच्या तुलनेत जास्त आहे.

काही काळानंतर बहुतांश फिन्फ्लुएंसर्स शेअर मार्केट तज्ज्ञ असल्याचं आव आणू लागले आहेत. शेअर्स गुंतवणुकीबाबत सल्ला , मिस-सेलिंग करण्यासाठी अनेक फिन्फ्लूएंसर्सनी फोलोअर्स वाढवण्यासाठी परताव्याबाबत खोटे दावे केले. तसेच ‘पंप आणि डंप’च्या माध्यमातून अनेक फिन्फ्लुएंसर्सनी भरपूर कमाई केली. ‘पंप आणि डंप’मध्ये कृत्रिमरित्या शेअर्सची मागणीत वाढ होते. मागणी वाढल्यानंतर किंमत वाढते. त्यानंतर चुकीची माहिती देणारे अनेक जण जास्त किमतीत शेअर्स विकून नफा कमावतात.

चार्ट रीडिंग आणि टेक्निकल अॅनालिसिसचा वापर करून फसवणूक कशा प्रकारे करण्यात येते हे तुम्हाला समजलं असेलच. कोणाचंही ऐकू नका असा सल्ला आम्ही तुम्हाला देत नाहीत. पण तज्ज्ञ व्यक्तीने सेबीकडे नोंदणी केली आहे का ?याची खात्री करा. सेबी नोंदणीकृत तज्ज्ञाच्या सल्ल्यावरही आंधळेपणाने विश्वास ठेऊ नका. समजूतदारपणे गुंतवणूक करणं यात शहाणपणा आहे. त्यामुळे जागे व्हा सोशल मीडियावरील माहिती पाहून गुंतवणूक करणं टाळा .

Published: December 7, 2023, 14:58 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App