गुंतवणुकीमध्ये बिहेव्हरिअल बायस म्हणजे काय?

गुंतवणूकदार भीती किंवा लालसेपोटी गुंतवणुकीचे बरेच निर्णय घेतात. गुंतवणुकीचे निर्णय घेताना गुंतवणूकदारांवर काही गोष्टींचा परिणाम होतो, त्यानुसार गुंतवणूकदार आर्थिक निर्णय घेताना जसे वागतात त्याला बिहेव्हरिअल बायस म्हणतात.

शिशिर त्याच्या लॅपटॉपवर शेअर्स संदर्भात माहिती घेत होता. हे बघून सुमेध तिथे येतो आणि शेअर मार्केटबद्दल त्याच्याकडे चौकशी करतो. शिशिर एका पेनी स्टॉकचा रिसर्च करत होता. शिशिर, हि कोणती कंपनी आहे, या कंपनीचं नाव मी कधीच ऐकलं नाही, असं सुमेध म्हणतो. अरे हा एक पेनी स्टॉक आहे, कंपनी कोणत्या व्यवसायात आहे ते काहीच कळत नाहीये. पण माझा एक मित्र आहे मोहित, त्याने 3 महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती. अवघ्या 3 महिन्यात त्याचे पैसे तिप्पट वाढले, असं शिशिर सांगतो. हि तर केवळ सुरुवात आहे, हा शेअर पुढच्या 1 वर्षात मल्टी-बॅगर होईल असं शिशिर म्हणतो. मी या शेअरमध्ये आता 5 लाख रुपयाची गुंतवणूक करणार आहे, असा निश्चय शिशिरने व्यक्त केला. हे ऐकून सुमेध त्याला सावध करतो, मागच्या 3 महिन्यात या शेअरने चांगला रिटर्न दिला म्हणजे भविष्यात तसाच रिटर्न याची काहीच गॅरंटी नाहीये. कोणाचंतरी ऐकून गुंतवणूक करण्यापेक्षा तू स्वतःचा रिसर्च कर. यामुळे, तुझ्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार तुला गुंतवणूक करता येईल, असा सल्ला सुमेध शिशिरला देतो.

सुमेधने शिशिरला अगदी योग्य सल्ला दिला आहे. शिशिर आणि मोहित जरी मित्र असले तरी त्या दोघांच्या गरजा वेगळ्या आहेत. दोघांचीही रिटर्नची अपेक्षा, जोखीम घेण्याची तयारी आणि स्वभाव वेगळे आहेत. त्यामुळे, केवळ 3 महिन्यात शेअर तिप्पट झाला म्हणून शिशिरला मोहितची कॉपी करणं योग्य नाहीये. समजा मोहितने तो शेअर 5 रुपयाला खरेदी केला होता ज्यांची किंमत आता 15 रुपये झाली आहे. आता जर 15 रुपयाला शिशिरने त्यामध्ये गुंतवणूक केली आणि दुर्दैवाने शेअर 10 रुपयांपर्यंत खाली आला तर शिशिरला जवळपास 35% लॉस होईल, मात्र मोहित अजूनही 100% प्रॉफिटमध्ये असेल. त्यामुळे, मित्राने शेअर खरेदी केला आहे म्हणून आपण कोणताही विचार न करता किंवा एनालिसिस करता त्यामध्ये गुंतवणूक केली तर नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. बऱ्याच वेळेला आपण मित्र किंवा नातेवाईकांचा ऐकून इंश्युरन्स प्लॅन, म्युच्युअल फंड, शेअर्स किंवा अन्य एखाद्या स्कीममध्ये गुंतवणूक करतो. पण जी गुंतवणूक तुमच्या मित्रासाठी चांगली आहे, ती तुमच्यासाठी असेलच असं नाही. आपले सगळे मित्र एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करत आहेत म्हंटल्यावर आपल्या मनात FOMO म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आऊटची भावना तयार होते आणि आपण घाई गडबडीत त्यामध्ये गुंतवणूक करतो.

behavioral finance मध्ये यालाच हर्ड मेन्टॅलिटी म्हणतात. गुंतवणूकदार भीती किंवा लालसेपोटी गुंतवणुकीचे बरेच निर्णय घेतात. गुंतवणुकीचे निर्णय घेताना गुंतवणूकदारांवर काही गोष्टींचा परिणाम होतो, त्यानुसार गुंतवणूकदार आर्थिक निर्णय घेताना जसे वागतात त्याला behavioral finance म्हणतात. तर, आपल्या आजूबाजूचे गुंतवणूकदार एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करत आहेत, मग आपण त्यामध्ये गुंतवणूक नाही केली तर आपण मागे पडू, या भीतीपोटी आपण इतरांना कॉपी करून जो निर्णय घेतो त्याला हर्ड मेन्टॅलिटी असं म्हणतात.

मोहीतचा रिटर्न बघून शिशिरच्या मनात FOMO ची भावना तयार झाली होती. मात्र, आता सुमेधने त्याला सावध केल्यावर त्याच्या मनात भीती तयार झाली आहे. एका बाजूला गुंतवणुकीची संधी आणि दुसऱ्या बाजूला लॉस होण्याची भीती अश्या द्विधा मनस्थितीत शिशिर अडकला आहे. आपल्यापैकी बरेच गुंतवणूकदार अश्या द्विधा मनस्थितीत गुंतवणुकीचे निर्णय घेतात, दुर्दैवाने अश्या प्रकारे घेतलेले बहुतांश निर्णय चुकतात. भविष्यात आपले निर्णय चुकू नये असं वाटत असेल तर आपल्याला बिहेव्हरिअल बायस म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. बायस म्हणजे पक्षपात किंवा पुर्वाग्रह मनात ठेऊन एखाद्या गोष्टीची विनाकारण बाजू घेणं किंवा निर्णय घेणं. यातून गुंतवणूकदारांची जी वागणूक पाहायला मिळते किंवा ते जे आर्थिक निर्णय घेतात त्यालाच बिहेव्हरिअल बायस म्हणतात. गुंतवणुकीच्या विश्वास असे अनेक बिहेव्हरिअल बायपास पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, तुम्ही कोणत्याही देशात गेला किंवा 100 200 500 वर्षाचा इतिहास बघितलात तरी या बिहेव्हरिअल बायसमध्ये काहीच बदल झाले नाहीयेत आणि भविष्यात ते होणारदेखील नाहीत. हे कोणते बायस आहेत आणि या चुका आपण कश्या टाळायच्या ते आता जाणून घेऊया.

बिहेव्हरिअल बायसमध्ये कन्फर्मेशन बायस, फॅमिलीरिटी बायस, लॉस अवर्षण असे 3 प्रमुख प्रकार आहेत ज्यामुळे गुंतवणुकीचे निर्णय चुकू शकतात. कन्फर्मेशन बायस म्हणजे आपल्या मनात एखादी गोष्ट इतकी खोलवर रुजलेली असते कि आपण त्याच्या विरुद्ध माहिती ऐकली तरी आपण त्यावर विश्वास ठेऊ शकत नाही. उदारणार्थ, शेअर मार्केट रिस्की आहे हे अनेक गुंतवणूकदारांच्या डोक्यात बसलं आहे. त्यामुळे, शेअर मार्केट हे नाव ऐकलं कि लगेच त्यांच्या डोक्यात रिस्की हा शब्ध येतो आणि ते शेअर मार्केट संदर्भातली कोणतीच गोष्ट समजून घ्यायला तयार होत नाहीत. एखाद्या खूपच आग्रह केला तर ते ऐकायचं म्हणून ऐकतात, पण आतून त्यांचं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचीच नाही, ते ठरलेलं असतं. यालाच कन्फर्मेशन बायस म्हणतात. एखाद्या गोष्टी संदर्भात आपलं जे मत आहे, त्याला पूरक असणारच माहिती आपण शोधात असतो हे देखील कन्फर्मेशन बायस आहे. आपल्या चांगला गुंतवणूकदार व्हायचं असेल तर हा बायस ठेऊन चालणार नाही. सगळ्या प्रकारची माहिती आपण माईंड ओपन ठेऊन ऐकली पाहिजे, त्यावर सारासार विचार केला पाहिजे आणि मगच गुंतवणुकीचा निर्णय घेतला पाहिजे. नाहीतर आपल्या हातून अनेक चांगल्या संधी निघून जाऊ शकतात.

दुसरा सर्वात महत्वाचा बायस आहे फॅमिलीरिटी बायस. ज्या गोष्टी ट्राईड अँड टेस्टेड आहेत अश्याच गोष्टींकडे आपला नेहमी कल असतो. उदारणार्थ, एखाद्या गुंतवणूकदाराला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित वाटतं. तर काही गुंतवणूकदार केवळ FD मध्ये गुंतवणूक करतात. काही गुंतवणूकदार त्यांना पूर्वी ज्या शेअर्समध्ये चांगला रिटर्न मिळाला आहे अश्याच ब्ल्यू चिप शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. इतिहासात ज्या ऍसेट्समधून आपल्याला चांगला रिटर्न मिळाला आहे, केवळ अश्याच ऍसेट्समध्ये गुंतवणूक करण्याला फॅमिलीरिटी बायस म्हणतात. हा बायस असणारे लोकं सहसा नवीन गोष्टी ट्राय करायला तयार नसतात. ज्या गोष्टींमध्ये आपल्याला कॅम्फोर्ट मिळतो त्यामध्ये गुंतवणूक करणं हि चांगली स्ट्रॅटेजी आहे. मात्र, काही रक्कम आपण नवीन साधनांमध्ये गुंतवली पाहिजे. यातून आपल्याला नवीन इंस्ट्रुमेंट्सची माहिती मिळेल. एखादी नवीन गुंतवणूक आपण केली तर कदाचित त्यातून आपल्याला खूप चांगला रिटर्न मिळू शकतो. त्यामुळे, कधी कधी चाकोरीच्या बाहेर येऊन गुंतवणूक केली तर आपलाच फायदा आहे.

तिसरा बायस आहे लॉस अवर्षण बायस. याचा सर्वाधिक फटका ट्रेडरला बसतो. ज्यावेळेला आपण एखादी ट्रेडिंग पोजिशन घेतो, त्यावेळेला तो ट्रेंड आपण विचार केला त्या दिशेने जाऊ शकतो किंवा विरद्ध दिशेने देखील जाऊ शकतो. जर ट्रेड आपल्या फेवरमध्ये गेला तर आपल्याला चांगला रिटर्न मिळेल, मात्र जर ट्रेड फसला तर स्टॉपलॉसच्या रूपात आपल्याकडे एक्सिट प्लॅन असायला पाहिजे. मात्र, बऱ्याच ट्रेडर्सला लॉस बुक करण्यात कमीपणा वाटतो किंवा त्यांना त्याची भीती वाटते. यालाच लॉस अवर्षण बायस असं म्हणतात.

आपल्यापैकी अनेक गुंतवणूकदारांना कळत नकळत या बायसचा फटका बसत असतो. आर्थिक निर्णय घेताना याप्रकारच्या बायसमुळे तुमचं कधी नुकसान झालं आहे का किंवा एखादी संधी हातातून निसटली आहे का, याचा अभ्यास करा. जे गुंतवणूकदार या बायसवर मात करतात, ते खूप चांगले गुंतवणूकदार बनतात. त्यामुळे, कोणत्याही एका विचाराशी बांधील राहू नका, काही ठराविक ऍसेट्सच्या कॅम्फोर्ट झोनमध्ये राहू नका आणि ट्रेडिंगमध्ये लॉस बुक करायला शिका. असं केल्याने, तुमचा पोर्टफोलिओ अधिक वेगाने वाढेल आणि आर्थिक उद्दिष्ट नक्की पूर्ण होतील.

Published: May 8, 2024, 20:31 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App