निवडणूक निकालानंतर कुठे गुंतवणूक करावी?

लोकसभा इलेक्शनमध्ये नरेंद्र मोदींना हॅट-ट्रिक करण्याची संधी मिळेल, हे मार्केट आता डिस्कॉउंट करेल. यामुळे, शेअर मार्केटमध्ये नवीन अपट्रेन्ड चालू होण्याची शक्यता आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी कोणते शेअर्स खरेदी करावे, तसेच कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी, ते आता जाणून घेऊया.

5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर झाला.

या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळणार नाही, असं भाकीत काही एक्सिट पोलमधून व्यक्त करण्यात आलं होतं. मात्र, सगळ्या एक्सिट पोलला चुकीचं ठरवत भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये बहुमत मिळवलं. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची ही सेमी-फायनल असल्याने, शेअर मार्केटचं सगळं लक्ष निकालांकडे होतं. निवडणुकीत भाजपला यश मिळालं नसतं, तर मार्केटमधील तेजीला ब्रेक लागला असता. त्यानंतर, लोकसभा निवडणुकांची टांगती तलवार डोक्यावर ठेऊन, मार्केटने पुढचे 6 महिने टाइम करेक्शन केलं असतं. मात्र, उत्तर भारतात मोदींचा करिष्मा अजूनही कायम आहे, आणि तो वाढतोय; हे जवळपास सिद्ध झालं आहे. लोकसभा इलेक्शनमध्ये नरेंद्र मोदींना हॅट-ट्रिक करण्याची संधी मिळेल, हे मार्केट आता डिस्कॉउंट करेल. यामुळे, शेअर मार्केटमध्ये नवीन अपट्रेन्ड चालू होण्याची शक्यता आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी कोणते शेअर्स खरेदी करावे, तसेच कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी, ते आता जाणून घेऊया.

 

कोणते शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्स खरेदी करायचे, ते जाणून घ्यायचं असेल तर आधी आपल्याला मार्केटची सध्याची परिस्थिती समजून घेतली पाहिजे.

मागच्या 1 वर्षात, निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्सने तब्बल 42% रिटर्न दिला आहे. या दरम्यान, निफ्टी मिडकॅप इंडेक्सने 35% रिटर्न दिला आहे. स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये एकतर्फी तेजी आली आहे, मात्र लार्जकॅप शेअर्सनी मार्केटला अंडर-परफॉर्म केलं आहे. मागच्या 1 वर्षात, निफ्टीने केवळ 7.4% रिटर्न दिला आहे. मागच्या 2 वर्षांचा विचार केल्यास, निफ्टी आणि सेन्सेक्सने फारसा रिटर्न दिला नाहीये. पास्ट परफॉर्मन्स खराब असल्यामुळे, लार्ज कॅप शेअर्समध्ये जोखीम कमी आहे. मागच्या 2 वर्षात निफ्टीने, 15000 ते 18800 या रेंजमध्ये कन्सॉलिडेशन करून मजबूत बेस बनवला आहे. त्यानंतर, निफ्टीने जून 2023 मध्ये मंथली चार्टवर ब्रेकआऊट देऊन, पुढचे 5 महिने पुन्हा एकदा टाइम करेक्शन केलं. या कन्सॉलिडेशननंतर, निफ्टीने आता ब्रेकआऊट दिला आहे, अशी माहिती शेअर मार्केट एक्सपर्ट अक्षय भनसाळी यांनी दिली आहे. त्यामुळे, लार्जकॅप शेअर्समध्ये पुढचे 1 वर्ष चांगली तेजी राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी स्मॉलकॅपपेक्षा लार्जकॅप शेअर्सवर लक्ष केंद्रित करावं, असा सल्ला अक्षय भनसाळी यांनी दिला आहे.

 

पण लार्जकॅप सेगमेंटमध्ये कोणत्या शेअर्समध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो, ते जाणून घेणं महत्वाचं आहे.

सेक्टरल इंडेक्सचा विचार केल्यास, निफ्टी रिअल्टी इंडेक्सने मागच्या 1 वर्षात सर्वाधिक रिटर्न दिला आहे. निफ्टी रिअल्टी इंडेक्सने तब्बल 14 वर्षानंतर मंथली चार्टवर ब्रेकआऊट दिला आहे. मंथली चार्टवर ब्रेकआऊट मिळाल्यानंतर, इंडेक्समध्ये पुढचे 3 ते 5 वर्ष तेजी चालू राहते, असा अनुभव आहे. रिअल इस्टेट कंपन्यांचा व्यवसाय वाढला, तर त्याचा फायदा हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना होऊ शकतो. LIC हाऊसिंग फायनान्सचा शेअर सध्या 492 रुपयाला ट्रेड करतोय. विशेष म्हणजे मागच्या 10 वर्षात कंपनीचा व्यवसाय सातत्याने वाढला आहे, तरीदेखील हा शेअर 6.5 PE च्या आकर्षक व्हॅल्युएशनला ट्रेड करतोय. याच सेक्टरमध्ये कॅन फिन होम्सचा शेअर 814 रुपयाला ट्रेड करतोय. या शेअरने 720 रुपयाचा महत्वाचा रेसिस्टन्स पार करून ब्रेकआऊट दिला आहे. 600 ते 800 रुपयाच्या रेंजमध्ये हा शेअर टप्याटप्याने खरेदी केला, तर चांगला रिटर्न मिळू शकतो. इलेक्ट्रिक वेहिकल सेगमेंटमध्ये आघाडीची कंपनी असणाऱ्या टाटा मोटर्सच्या शेअरनेदेखील 650 रुपयाची महत्वाची पातळी पार करून तेजीचे संकेत दिले आहेत. 600 ते 700 रुपयाच्या रेंजमध्ये हा शेअर खरेदी केला, तर पुढच्या 3 वर्षात चांगला रिटर्न मिळू शकतो.

 

ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी IT आणि फार्मा फंड्समध्ये SIP करण्याची संधी आहे.

फार्मा इंडेक्समध्ये मागच्या 8 वर्षात काहीच रिटर्न मिळाला नाहीये. या दरम्यान, कंपन्यांच्या उत्पन्नात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. त्यामुळे, फार्मा फंड्समध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो. तसेच, अमेरिकेत व्याजदर वाढल्यामुळे IT सेक्टर सध्या अडचणीत आहे. या अडचणीच्या काळात, IT फंड्समध्ये SIP च्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास, पुढच्या 5 ते 7 वर्षात चांगला रिटर्न मिळू शकतो. ज्यांना कोणतीच जोखीम न घेता म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी लॉन्ग ड्युरेशन फंड्सचा पर्याय आहे. भारतात रिजर्व बँकेने व्याजदरात अडीच टक्यांची वाढ केली आहे. मात्र, मागच्या 6 महिन्यात रिजर्व बँकेने व्याजदरवाढ थांबवली आहे. महागाई आटोक्यात आली तर रिजर्व बँक पुढच्या 1 वर्षात व्याजदरकपात चालू करू शकते. असं झाल्यास, लॉन्ग ड्युरेशन डेट फंड्समध्ये FD पेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतो. एकंदरीत विचार केल्यास, पुढचं 1 वर्ष लार्जकॅप शेअर्ससाठी चांगलं राहण्याची शक्यता आहे. चांगले फंडामेंटल्स असणारे शेअर्स आकर्षक व्हॅल्युएशनला खरेदी केले, तर आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतो.

Published: December 4, 2023, 19:00 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App