फॅशन ज्वेलरी + गोल्ड बॉण्ड = फायद्याची गुंतवणूक

तुम्ही जर सोन्याचे दागिने खरेदी करायचा विचार करत असाल, तर या स्ट्रॅटेजीचा नक्की विचार करा. याचे फायदे तुमच्या घरातल्या लोकांना समजावून सांगा. जग बदलतंय त्यामुळे आपल्याला देखील आपली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बदलण्याची गरज आहे.

धीरज आणि रजत सोन्यातल्या गुंतवणुकीसंदर्भात चर्चा करत होते. रजतने मागच्या मे महिन्यात त्याच्या आई आणि पत्नीसाठी दागिने बनवून घेतले. गावाकडची जमीन विकून त्याला 20 लाख रुपये मिळाले, त्यापैकी आई आणि पत्नीसाठी त्याने प्रत्येकी 10 10 तोळे दागिने खरेदी केले. त्यावेळेला सोन्याचा रेट होता 60000 रुपये प्रति तोळा. आता सोन्याचा रेट 75000 रुपयांपर्यंत वाढल्यामुळे रजत खूप खुश आहे. एक वर्षात आपल्याला 25% रिटर्न मिळाल्याचं तो धीरजला सांगतो. अरे रजत, तुला 25% रिटर्न मिळाला नाहीये, तुला केवळ 5% रिटर्न मिळाला आहे, असं धीरज म्हणतो. हे ऐकून रजत गोंधळात पडतो, आपल्याला मित्राला एवढं बेसिक कॅल्क्युलेशन येत नाही का, असा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. 60000 रुपयावर 15000 रुपये नफा, म्हणजे 25% रिटर्न असं रजत त्याला समजून सांगतो. पण दुर्दैवाने धीरज जे म्हणाला ते खरं आहे. रजतला 25% नाहीतर केवळ 5% रिटर्न मिळाला आहे. कसं ते जाणून घेऊया.

रजतने ज्यावेळेला दागिने खरेदी केले तेव्हा सोन्याचा रेट चालू होता 60000 रुपये. त्याने आई आणि पत्नीसाठी बांगड्या आणि नेकलेस खरेदी केले. त्यावर, त्याला 15% मेकिंग चार्जेस भरावे लागले. तसेच, मेकिंग चार्जेसवर 5% GST आणि सोन्याच्या मूल्यावर 3% अतिरिक्त भरावा लागला. याचा अर्थ, रजतने 60000 रुपये प्रति तोळा या रेटने सोनं खरेदी केलं पण प्रत्येक तोळ्यासाठी त्याने 9000 रुपये मेकिंग चार्जेस आणि त्यावर 5% GST असे 9450 रुपये अतिरिक्त भरले. याशिवाय 60000 रुपयावर 3% GST म्हणजे 1800 रुपये प्रति तोळा आणखी भरावे लागले. याचा अर्थ, रजतने 60000 रुपये प्रति तोळा नाहीतर साधारण 71250 रुपये प्रति तोळा या रेटने सोनं खरेदी केलं. आता सोन्याचा रेट चालू आहे 75000 रुपये. म्हणजे रजतला या गुंतवणुकीवर केवळ 5% रिटर्न मिळाला. त्याच वेळेला धीरजने पु ना गाडगीळांच्या गार्गी फॅशनमधून पत्नी आणि आईसाठी रोजच्या वापरासाठी फॅशन ज्वेलरी खरेदी केली आणि बाकी पैसे रिजर्व बँकेच्या गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवले.

धीरजने सोन्याचा रेट 60000 रुपये चालू असताना रिजर्व बँकेच्या गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्याने हे बॉण्ड ऑनलाईन खरेदी केला त्यामुळे त्याला प्रति तोळा 500 रुपयाचा डिस्कॉउंट मिळाला. त्याच बरोबर, वर्षातून दोनदा त्याला एकूण अडीच % व्याज देखील मिळालं. साधारण 1% ऑनलाईन डिस्कॉउंट, 25% सोन्याच्या किमतींमध्ये झालेली वाढ आणि अडीच टक्के व्याज असा त्याला एक वर्षात जवळपास 28% रिटर्न मिळाला. धीरजने सोनं खरेदी करताना पत्नीला समजावलं. आपल्याकडे मंगळसूत्र, बांगड्या आणि एक नेकलेस आहे. आता परत सोन्याचे दागिने खरेदी करण्यापेक्षा तू फॅशन ज्वेलरी वापरून बघ. तुला नाही आवडले तर पुढच्या वर्षी आपण गोल्ड बॉण्ड विकून सोन्याचे दागिने बनवून घेऊ. फॅशन ज्वेलरी स्वस्त आहे, त्यामध्ये व्हरायटी भरपूर आहे, फार महाग नसल्यामुळे आपण प्रत्येक वर्षी नवीन डिझाईनचे दागिने घेऊ शकतो. दागिने चोरी होण्याची भीतीदेखील यामध्ये नसते. एवढे सगळे फायदे बघून धीरजच्या पत्नी आणि आईने गोल्ड बॉण्डमध्ये असणारी गुंतवणूक तशीच चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. आता धीरजने जे 12 लाख रुपये गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवले आहेत, त्यावर त्याला दर वर्षी अडीच % म्हणजे 30000 रुपये व्याज मिळतं. तो दर वर्षी पु ना गाडगीळांच्या गार्गी फॅशन आणि इतर नामांकित ज्वेलर्सकडे जाऊन या 30000 रुपयाची ज्वेलरी खरेदी करतो. एका बाजूला त्याचा कॉर्पस वाढतोय, तर दुसऱ्या बाजूला तो दर वर्षी भरपूर दागिने खरेदी करतोय. त्याला सुरुवातीच्या गुंतवणुकीवर ना कोणता GST भरावा लागला ना कोणते मेकिंग चार्जेस. त्यामुळे, तुम्ही जर सोन्याचे दागिने खरेदी करायचा विचार करत असाल, तर या स्ट्रॅटेजीचा नक्की विचार करा. याचे फायदे तुमच्या घरातल्या लोकांना समजावून सांगा. जग बदलतंय त्यामुळे आपल्याला देखील आपली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बदलण्याची गरज आहे.

Published: May 9, 2024, 14:27 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App