म्युच्युअल फंडचं मर्जर म्हणजे काय? त्याचा कामगिरीवर काय परिणाम होतो?

जेव्हा एखाद्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये असणारे होल्डिंग्स दुसऱ्या एका फंडमध्ये ट्रान्स्फर केले जातात, त्याला स्कीमचं मर्जर म्हणतात. कधी कधी एक फंड बंद करून त्याचं दुसऱ्या फंडमध्ये विलीनीकरण केलं जातं, तर काही केसेस मध्ये दोन्ही फंड बंद करून एक नवीन फंड बनवला जातो. मात्र, मर्जरनंतर फंडच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये, तसेच एक्सपेन्स रेशिओ, रिस्क प्रोफाइल आणि टॅक्सेशनमध्ये काही बदल होणार आहेत का, ते बघितलं पाहिजे.

तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला AMC कडून मेल आणि SMS येत असतील. फंड संदर्भात कोणतीही महत्वाची माहिती AMC ला गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवावी लागते. एखादया नवीन फंडचं लॉन्चिंग असेल, किंवा जुन्या स्कीमच्या एक्सपेन्स रेशिओमध्ये काही बदल असतील किंवा अन्य नियमांमध्ये काही बदल असतील, या प्रकारची सर्व माहिती म्युच्युअल फंड कंपनी आपल्याला पाठवत असते. मात्र, सध्या मेलवर इतक्या जाहिराती येतात कि कोणता मेल वाचायचा आणि कोणता नाही तेच आपल्याला कळत नाही. अश्या परिस्थितीत एखादा महत्वाचा मेल वाचायचा राहू शकतो. मात्र, असं करून चालणार नाही, आपल्या फंड संदर्भात सगळी महत्वाची माहिती आपण व्यवस्थित वाचली पाहिजे. असाच एक मेल विशालच्या म्युच्युअल फंड कंपनीने त्याला पाठवला. आम्ही तुमच्या फंडचं मर्जर म्हणजेच विलीनीकरण दुसऱ्या एका फंडमध्ये करत आहोत, असं त्या मेलमध्ये सांगण्यात आलं होतं. म्युच्युअल फंड कंपनीने त्यांच्या मिडकॅप फंडचं विलीनीकरण स्मॉलकॅप फंडमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. असा मेल वाचल्यावर गुंतवणूकदारांच्या मनात गोंधळ निर्माण होतो, मात्र अश्या परिस्थितीत घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये. सगळ्यात आधी मर्जर म्हणजे काय, ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे.

जेव्हा एखाद्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये असणारे होल्डिंग्स दुसऱ्या एका फंडमध्ये ट्रान्स्फर केले जातात, त्याला स्कीमचं मर्जर म्हणतात. कधी कधी एक फंड बंद करून त्याचं दुसऱ्या फंडमध्ये विलीनीकरण केलं जातं, तर काही केसेस मध्ये दोन्ही फंड बंद करून एक नवीन फंड बनवला जातो. मात्र, मर्जरनंतर फंडच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये, तसेच एक्सपेन्स रेशिओ, रिस्क प्रोफाइल आणि टॅक्सेशनमध्ये काही बदल होणार आहेत का, ते बघितलं पाहिजे. जर यामध्ये काहीच बदल होणार नसेल तर घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. मात्र, फंड मॅनेजर, फंडची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आणि इतर महत्वाच्या गोष्टी बदलणार असतील तर मात्र आपल्याला विचार करावा लागेल. उदारणार्थ, नुकतंच आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडने त्यांच्या क्रिसिल IBX AAA मार्च 2024 इंडेक्स फंडचं मर्जर आदित्य बिर्ला सनलाईफ कॉर्पोरेट बॉण्ड फंडमध्ये केलं. हे मर्जर 2 एप्रिल 2024 पासून लागू होईल. मात्र, या दोन्ही फंडच्या स्ट्रॅटेजीमध्ये फारसा फरक नव्हता, त्यामुळे या केसमध्ये गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूक तशीच ठेऊ शकतात. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे म्युच्युअल फंड कंपन्या स्कीम्सचं मर्जर का करतात, चला तर मग जाणून घेऊया.

म्युच्युअल फंड कंपन्यांचे निर्णय इतर गोष्टींवर अवलंबून असतात. उदारणार्थ, सरकार, सेबी, अँफीसारख्या संस्था कोणते निर्णय घेत आहेत तसेच मार्केटमध्ये कोणत्या नवीन गोष्टी घडत आहेत याचा अंदाज घेऊन म्युच्युअल फंड कंपन्या त्यांची स्ट्रॅटेजी ठरवतात. जर एखाद्या फंडमध्ये आता काही वेगळेपण राहिलं नसेल तर तो फंड चालू ठेऊन काहीच फायदा नसतो. फंडचं स्ट्रक्चर सोपं करणे, मॅनेजमेंट खर्च कमी करणे, पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये सुधारणा करणे, फंडचे ऑपरेशन सुलभ करणे, गुंतवणूकदारांना जास्त रिटर्न मिळवून देणे अश्या वेगवेगळ्या कारणांसाठी म्युच्युअल फंड कंपन्या स्कीम्सचं मर्जर करण्याचा निर्णय घेतात. काही वेळेला एखादा फंड चांगली कामगिरी करत नसेल तर त्याचंही मर्जर होऊ शकतं. मात्र, कोणतंही मर्जर करण्यापूर्वी AMC ला ही माहिती गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवणं बंधनकारक आहे. आपल्याला AMC कडून मर्जर संदर्भात मेल किंवा SMS आला तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. कारण मर्जरचं कारण आणि त्यानंतर फंडमध्ये होणारे बदल ही सर्व माहिती मर्जरच्या आधी आपल्यापर्यंत पोहोचते. तसेच, फंडमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला 30 दिवसांचा पुरेसा वेळ दिला जातो. अश्या परिस्थितीत म्युच्युअल फंड कंपन्या एक्सिट लोड आकारू शकत नाहीत. मात्र, टॅक्सेशनचा आपल्याला फटका बसू शकतो. आपण फंडमधून बाहेर पडलो तर कॅपिटल गेनवर आपल्याला टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे, फंडने मर्जरचा निर्णय घेतला तर बाहेर पडण्याची खरंच गरज आहे का, त्याचा विचार करा. तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या आणि मगच निर्णय घ्या.

आपल्याला फंडकडून मेल आल्यानंतर त्यांना निर्णय कळवावा लागतो. आपण मर्जरसाठी संमती नाही दिली तर म्युच्युअल फंड कंपनी मार्केट NAV नुसार युनिट्स रिडिम करेल आणि पैसे अकॉउंटमध्ये जमा केले जातील. मर्जरसाठी आपण परवानगी दिली तर मग नवीन स्कीमचे युनिट्स आपल्याला अलॉट होतील. त्यानंतर, आपण युनिट्स रिडिम करायचा निर्णय घेतला तर मात्र एक्सिट लोड भरावा लागेल. त्यामुळे, व्यवस्थित विचार करून फंडमध्ये गुंतवणूक चालू ठेवण्याचा किंवा बाहेर पडण्याचा आपण निर्णय घेतला पाहिजे, असं मत फिनवायजरचे फाऊंडर आणि CEO जय शाह यांनी दिला आहे. एकंदरीत विचार केला तर मर्जरचा मेल आला तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये. पण आपण याकडे दुर्लक्ष करून देखील चालणार नाही. फंड हाऊसने मर्जर करण्याचा निर्णय का घेतला आहे, त्याचा फंडच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होईल का आणि आपलं गुंतवणुकीचा उद्दिष्ट नवीन स्कीममध्ये पूर्ण होईल का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून गुंतवणूक चालू ठेवण्याचा किंवा फंडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागेल.

Published: March 23, 2024, 10:38 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App