लीजहोल्ड प्रॉपर्टी खरेदी करावी का?

प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी फ्रीहोल्ड आणि लिजहोल्ड, या 2 प्रकाराबद्दल माहिती जाणून घेणं महत्वाचं आहे. चला तर मग यामध्ये नक्की काय फरक आहे, ते जाणून घेऊया.

2002 ते 2014 दरम्यान रिअल इस्टेटमध्ये खूप मोठी तेजी पाहायला मिळाली.

या दरम्यान, पुणे आणि मुंबईसारख्या शहरात घरांच्या किमती 5 ते 10 पट वाढल्या. मात्र, त्या तुलनेत लोकांचं उत्पन्न वाढलं नाही. त्यामुळे, 2014 नंतर या तेजीला ब्रेक लागला. 2014 ते 2022 हा काळ रिअल इस्टेट सेक्टरसाठी अतिशय कठीण होता. वाढलेल्या किमती, नोटबंदी आणि रेरासारखे अनेक धक्के रिअल इस्टेट सेक्टरने पचवले. मात्र, 2023 पासून रिअल इस्टेटमध्ये नवीन अपट्रेन्ड चालू झाल्याचा अंदाज, अनेक तज्ञ् व्यक्त करत आहेत. रिअल इस्टेट कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतींमधून आपल्याला त्याची कल्पना येत आहे. जर रिअल इस्टेटमध्ये खरंच नवीन अपट्रेन्ड चालू झाला असेल, तर पुढच्या काही वर्षात घरांच्या किमती अनेक पटींनी वाढू शकतात. प्रॉपर्टीच्या किमती दर वर्षी 7 टक्याने वाढल्या आणि वार्षिक 3% रेंटल यिल्ड मिळालं तरी गुंतवणूकदारांना वार्षिक 10% रिटर्न मिळू शकतो. मात्र, प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी फ्रीहोल्ड आणि लिजहोल्ड, या 2 प्रकाराबद्दल माहिती जाणून घेणं महत्वाचं आहे. चला तर मग यामध्ये नक्की काय फरक आहे, ते जाणून घेऊया.

 

फ्रीहोल्ड प्रॉपर्टीमध्ये, मालकीहक्क नेहमी खरेदीदाराकडे राहतो.

त्याच्यानंतर, हे अधिकार खरेदीदाराच्या कायदेशीर वारसांना हस्तांतरित केले जातात. मालमत्तेची विक्री होईपर्यंत, मालकाकडे वापर, बांधकाम आणि विक्री करण्याचे अधिकार असतात. यामध्ये जमीन आणि त्यावर बांधलेली बिल्डिंग या दोन्हींचा समावेश आहे. देशातील बहुतेक प्रॉपर्टी फ्रीहोल्ड आहेत. दुसरीकडे, लीजहोल्ड प्रॉपर्टीमध्ये, खरेदीदाराला विशिष्ट कालावधीसाठी, सरकार किंवा सरकारी एजन्सीद्वारे मालकीहक्क प्रदान केला जातो. उदाहरणार्थ, नोएडासारख्या ठिकाणी, सरकार शेतकऱ्यांकडून जमीन घेऊन ती बिल्डरला भाडेतत्त्वावर देतं, नंतर बिल्डर जमिनीवर अपार्टमेंट बांधतात आणि खरेदीदारांना विकतात. लिजहोल्ड प्रॉपर्टीमध्ये कालावधी निश्चित असतो. हा कालावधी 30 ते 99 वर्ष असून शकतो. मात्र, त्यानंतर मालकीहक्क परत मूळ मालकाकडे हस्तांतरित केला जातो. कालावधी संपल्यानंतर, सरकार काही शुल्क घेऊन लीजचा कालावधी वाढवू शकतं किंवा त्याच प्रॉपर्टीचं रूपांतर फ्रीहोल्डमध्ये करू शकतं.

 

लिजहोल्ड प्रॉपर्टीचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे, या प्रॉपर्टी स्वस्त असतात.

लिजहोल्ड म्हणजे काही कालावधीसाठी आपण एकरकमी पैसे देऊन प्रॉपर्टी घेतो. त्यामुळे, दर महिन्याला भाडं देऊन राहणं आणि फ्रीहोल्ड प्रॉपर्टी खरेदी करणं, यातला लिजहोल्ड हा मधला मार्ग आहे. फ्रीहोल्ड प्रॉपर्टीपेक्षा कमी किमतीत लिजहोल्ड प्रॉपर्टी खरेदी करता येते. यामध्ये, कालावधी मोठा असल्यामुळे, सारखं घर बदलायचं टेन्शन राहत नाही. फ्रीहोल्ड आणि लिजहोल्ड प्रॉपर्टीच्या किमतींमध्ये किती फरक आहे, यावर कोणता पर्याय फायद्याचा आहे हे ठरवावं लागेल. दोन्हीमध्ये फारसा फरक नसेल तर फ्रीहोल्ड प्रॉपर्टी खरेदी करणं फायद्याचं आहे. बऱ्याच वेळेला आपण फ्रीहोल्ड प्रॉपर्टी खरेदी करतोय का लिजहोल्ड तेच गुंतवणूकदारांना कळत नाही. त्यामुळे, तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर प्रॉपर्टीचा प्रकार कोणता आहे, ते चेक करा. तुम्ही राहण्यासाठी घर घेत असाल तर शक्यतो फ्रीहोल्ड प्रॉपर्टी खरेदी करा. मात्र, गुंतवणूक म्हणून प्रॉपर्टी घेतं असाल तर दोन्ही प्रकारच्या प्रॉपर्टीची चौकशी करा. दोन्हीपैकी कोणत्या प्रॉपर्टीवर जास्त रिटर्न मिळू शकतो, त्याचं कॅल्क्युलेशन करा आणि मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्या.

Published: December 11, 2023, 17:12 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App