Home Loan Transfer करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा?

मागच्या 2 वर्षात RBI ने रेपो रेटमध्ये जवळपास अडीच टक्यांची वाढ केली आहे. त्यामुळे, साडे सहा ते सात टक्के असणारा होम लोनचा व्याजदर आता 9 टक्यावर पोहोचला आहे. अश्या परिस्थितीत, ग्राहकांकडे होम लोन ट्रान्स्फर करण्याचा पर्याय आहे. मात्र, होम लोन ट्रान्स्फर करताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे, ते आता जाणून घेऊया.

मागच्या 2 वर्षात RBI ने रेपो रेटमध्ये जवळपास अडीच टक्यांची वाढ केली आहे.

त्यामुळे, साडे सहा ते सात टक्के असणारा होम लोनचा व्याजदर आता 9 टक्यावर पोहोचला आहे. पूर्वी पन्नास लाख आणि 30 वर्षाच्या होम लोनसाठी साधारण 32 हजार रुपये EMI होता, तो वाढून आता 40000 च्या वर गेला आहे. त्यामुळे, सर्वसामान्य कर्जदाराची झोप उडाली आहे. ज्यांनी EMI वाढवला नाही, त्याच्या री-पेमेंट पिरिअडमध्ये 5 ते 7 वर्षांची वाढ झाली आहे. म्हणजेच काय तर RBI च्या व्याजदरवाढीमुळे, सर्वसामान्य कर्जदाराचं लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे. दुसऱ्या बाजूला, बँका नवीन ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी आकर्षक व्याजदर ऑफर करतात आणि जुन्या ग्राहकांकडून जास्त व्याज घेतात. नवीन ग्राहकांना SBI ICICI HDFC सारख्या बँका 8.5 ते 8.65%……. व्याजदराने होम लोन देत आहेत. मात्र, जुन्या ग्राहकांना यापेक्षा जास्त व्याज भरावं लागतं. अश्या परिस्थितीत, ग्राहकांकडे होम लोन ट्रान्स्फर करण्याचा पर्याय आहे. मात्र, होम लोन ट्रान्स्फर करताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे, ते आता जाणून घेऊया.

 

तुम्ही होम लोन ट्रान्स्फर करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, किती कालावधी बाकी आहे हे बघणं अत्यंत आवश्यक आहे.

जर तुमचं होम लोन संपायला 20 किंवा 25 वर्षापेक्षा जास्त कालावधी असेल, तर होम लोन ट्रान्स्फर करणं फायद्याचं आहे. कारण, कर्जाच्या परतफेडीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, तुमचा बहुतांश EMI व्याजात जातो. म्हणूनच, व्याजदरात थोडी बचत झाली तरी तुमचा खूप मोठा फायदा होईल. दुसऱ्या बाजूला, तुमचं होम लोन जुनं असेल आणि आता 10 वर्षापेक्षा कमी कालावधी राहिला असेल, तर तुमच्या EMI चा बराच हिस्सा मुद्दलीमध्ये जमा होईल. अश्या केसमध्ये होम लोन ट्रान्स्फर करून काहीच फायदा होणार नाही.

 

आपण होम लोन ट्रान्स्फर करतो, त्यावेळेला केवळ व्याजात होणाऱ्या बचतीवर आपलं लक्ष असतं.

मात्र, प्रोसेसिंग फी, मॉर्टगेज चार्जेस आणि लीगल चार्जेसमध्ये किती खर्च होणार आहे, त्याची आधीच माहिती घेतली पाहिजे. होम लोन ट्रान्स्फर केल्यावर दर महिन्याला व्याजात आपली जी बचत होणार आहे, ती रक्कम आणि लोन ट्रान्स्फर करण्यासाठी होणारा खर्च, याचा आपण हिशोब केला पाहिजे. पे बॅक पिरिअड जर 24 महिन्यांपेक्षा कमी असेल, तरच लोन ट्रान्स्फर करण्यात अर्थ आहे. तसेच, नवीन ठिकाणी नियम आणि अटी काय आहेत, त्याची व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे. होम लोन ट्रान्स्फर करण्यासाठी व्याजदर हा एकमेव निकष असू शकत नाही. तुम्ही ज्या बँक किंवा NBFC मध्ये होम लोन ट्रान्स्फर करत आहात, तिथे तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळेल का याचीदेखील खात्री करा. तसेच, काही वर्षानंतर बँक लोनवर असणारा स्प्रेड वाढवणार नाही ना, याची खात्री करा. आपल्या जुन्या बँकेत किंवा NBFC मध्ये होम लोन बंद करण्याचा अर्ज दिल्यानंतर, त्यांच्याकडून काही प्रस्ताव येतोय का ते बघा. ग्राहक रिटेन करण्यासाठी वित्तीय संस्था व्याजदर कमी करायला तयार होतात. नवीन ठिकाणी मिळणारा व्याजदर जुन्या बँकेत मिळाला, तर तुमचं व्याज वाचेल आणि लोन ट्रान्स्फर करायचा खर्च ही वाचेल. अश्या पद्धतीने होम लोन ट्रान्स्फरचा निर्णय विचारपूर्वक घेतला तर तुमची मोठी बचत होऊ शकते.

Published: December 12, 2023, 18:51 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App