NPS मधून किती आणि कधी पैसे काढता येतात?

पेन्शन फंड नियामक PFRDA ने नुकतेच NPS मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता खातेदार योजनेच्या कालावधीत तीन वेळा पार्शिअल विथड्रॉवल करू शकतो. पण NPS मधून पैसे काढण्यासाठी नवीन नियम काय आहेत? तुम्ही कधी आणि किती पैसे काढू शकता? याबद्दल आता जाणून घेऊया.

तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं असेल तर NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम हा सर्वात चांगला पर्याय आहे. पेन्शन फंड नियामक PFRDA ने नुकतेच NPS मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता खातेदार योजनेच्या कालावधीत तीन वेळा पार्शिअल विथड्रॉवल करू शकतो. पण NPS मधून पैसे काढण्यासाठी नवीन नियम काय आहेत? तुम्ही कधी आणि किती पैसे काढू शकता? याबद्दल आता जाणून घेऊया. तुम्हाला NPS खाते उघडून तीन वर्ष झाली असतील, तर तुम्ही त्यातून काही पैसे काढू शकता. नवीन नियम 1 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत. पण NPS मधून किती रक्कम काढता येईल हा मोठा प्रश्न आहे… नवीन नियमांनुसार, NPS खातेधारक त्यांच्या योगदानाच्या केवळ 25 टक्के रक्कम काढू शकतात.

उदाहरणार्थ, समीरने पाच वर्षांपूर्वी NPS खातं उघडलं आहे आणि आतापर्यंत त्याने या खात्यात आठ लाख रुपये जमा केले असतील आणि ही रक्कम व्याजासहित आता 12 लाख रुपये झाली आहे… आता जर त्याला NPS मधून पैसे काढायचे असतील तर तो 8 लाख रुपयांच्या 25 टक्के रक्कम म्हणजेच 2 लाख रुपये काढू शकतो. इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे मार्केट व्हॅल्यू नाहीतर आपण जमा केलेल्या रकमेच्या 25% रक्कम काढता येईल. NPS मध्ये आपल्याला पाहिजे त्या कारणासाठी पैसे काढता येत नाहीत, यासाठी PFRDA ने काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. यानुसार खातेदाराच्या मुलांचं शिक्षण, उच्च शिक्षण आणि लग्नासाठी NPS खात्यातून पैसे काढता येतील. घर खरेदी किंवा बांधकामासाठी तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर घर खरेदी करत असाल किंवा बांधत असाल, तरीही तुम्ही पैसे काढू शकता. वडिलोपार्जित मालमत्ते व्यतिरिक्त खातेदाराच्या नावावर आधीच घर असेल तर मात्र त्याला पैसे काढता येणार नाहीत. कॅन्सर, हृदयविकार, किडनी यासारखा गंभीर आजार किंवा अपघातात दुखापत झाली आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं तर NPS मधून पैसे काढण्याची परवानगी आहे. PFRDA ने कोणत्या आजारांसाठी पैसे काढता येतील याची यादी जारी केली आहे. खातेदार कोणत्याही कारणामुळे काम करू शकत नसेल किंवा त्याला स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप चालू करायचा असेल तर तो NPS मधून पैसे काढू शकतो. मात्र, खातेधारक NPS खात्याच्या संपूर्ण कार्यकाळात केवळ तीन वेळा या सुविधेचा लाभ घेऊ शकेल. पण गंभीर आजाराच्या बाबतीत निधी काढण्यावरील हे निर्बंध लागू होणार नाहीत.

जर तुम्ही NPS खात्यातून पैसे काढण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यासाठी एक प्रोसेस पूर्ण करावी लागेल. या अंतर्गत तुम्हाला सगळ्यात आधी अर्ज सादर करावा लागेल. हे पैसे कोणत्या कारणासाठी काढले जात आहेत हे नमूद करावं लागेल. हा फॉर्म CRA म्हणजेच सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सीला पॉइंट ऑफ प्रेझेन्स द्वारे पाठवावा लागेल. खातेदाराला काही गंभीर आजार किंवा अपघात झाला असेल आणि तो फॉर्म सबमिट करण्याच्या स्थितीत नसेल तर त्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य हे काम करू शकतो. अर्ज प्राप्त झाल्यानंतर, CRA पैसे काढण्याची प्रक्रिया चालू करेल. सर्व माहिती बरोबर असेल तर पैसे हस्तांतरित केले जातील. NPS खात्यातून काढलेली रक्कम करमुक्त असेल.

रिटायरमेंट प्लॅनिंग हा फायनान्शिअल प्लॅनिंगचा महत्वाचा भाग आहे, त्यामुळे आपल्याला खरंच गरज असेल तरच NPS मधून पैसे काढावे, असा सल्ला टॅक्स आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट बळवंत जैन यांनी दिला आहे. पैशाची गरज असेल तर दुसऱ्या मार्गाने पैसे जमा करता येतायेत का, त्यासाठी प्रयत्न करा. काहीच पर्याय नसेल तरच NPS मधून पैसे काढण्याचा निर्णय घ्या, असं बळवंत जैन म्हणाले आहेत. NPS मध्ये कंपाऊंड इंटरेस्टचा फायदा मिळतो, त्यामुळे शक्यतो त्यातून पैसे काढू नयेत, असं केल्या तुम्हाला चांगली वेल्थ क्रिएट करता येईल. मुलांचं शिक्षण आणि लग्नासाठी तुम्ही म्युच्यअल फंडमध्ये SIP करून पैसे जमा करू शकता. तसेच, पुरेसा हेल्थ इंश्युरन्स खरेदी केला असेल तर गंभीर आजारासाठी NPS मधून पैसे काढायची गरज पडणार नाही. एकंदरीत विचार केल्यास, NPS मधून पैसे काढण्याची सुविधा सरकारने आपल्याला दिली आहे, मात्र शक्यतो त्याचा वापर करू नये.

Published: March 1, 2024, 20:45 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App