सुकन्या समृद्धी योजना - गुंतवणूक एक, फायदे अनेक

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही निवासी भारतीय आणि मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक असणं आवश्यक आहे. मुलीचा जन्म झाल्यापासून ती 10 वर्षांची होईपर्यंत सुकन्या समृद्धी अकॉउंट उघडता येतं. पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत जाऊन हे अकॉउंट आपण उघडू शकतो. किमान 250 रुपये टाकून हे अकॉउंट चालू करता येतं.

तीन महिन्यांपूर्वी मोहीतला मुलगी झाली, मुलीला हातात घेतल्यावर त्याला खूप आनंद झाला पण त्याला जवाबदारीची जाणीव देखील झाली. मोहितला इंजिनिअरिंग नंतर अमेरिकेत जाऊन MS करायचं होतं. पण त्याची आर्थिक परिस्थिती खराब होती, त्यामुळे त्याच हे स्वप्न अपूर्ण राहिलं. मात्र, माझं स्वप्न माझी मुलगी पूर्ण करेल असा निश्चय त्याने केला आहे. आपल्याला पैशाअभावी मनाप्रमाणे शिकता आलं नाही, मात्र आपल्या मुलांच्या बाबतीत काहीही झालं तरी असं होऊ देणार नाही, असा निश्चय मोहितने केला आहे. मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी लगेचच गुंतवणूक करण्याचा मोहितच्या प्लॅन आहे. इंश्युरन्स प्लॅन, म्युच्युअल फंड SIP, PPF आणि सुकन्या समृद्धी योजना असे 4 पर्याय त्याच्या समोर आहेत. काही पैसे खात्रीशीर रिटर्न देणाऱ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तर काही पैसे जास्त रिटर्न देणाऱ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवण्याचा त्याचा प्लॅन आहे. थोडी जोखीम घेऊन काही पैसे हायब्रीड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्याचा निर्णय मोहितने घेतला आणि SIP देखील चालू केली. मात्र, खात्रीशीर रिटर्न देणाऱ्या पर्यायामध्ये नक्की कोणता पर्याय फायदेशीर असेल असा प्रश्न त्याला पडला आहे. यासाठी मोहितने बराच रिसर्च केला. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक केली तर चांगला आणि खात्रीशीर रिटर्न मिळेल, तसेच टॅक्स बेनिफिटदेखील होईल, त्यामुळे या योजनेतच गुंतवणूक करावी असं त्याने निश्चित केलं आहे.

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही निवासी भारतीय आणि मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक असणं आवश्यक आहे. मुलीचा जन्म झाल्यापासून ती 10 वर्षांची होईपर्यंत सुकन्या समृद्धी अकॉउंट उघडता येतं. पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत जाऊन हे अकॉउंट आपण उघडू शकतो. किमान 250 रुपये टाकून हे अकॉउंट चालू करता येतं. अकॉउंट चालू ठेवण्यासाठी आपल्याला प्रत्येक वर्षी किमान 250 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. एका मुलीसाठी पालक जास्तीतजास्त दिढ लाख रुपयाची वार्षिक गुंतवणूक करू शकतात. ही गुंतवणूक एकरकमी किंवा इन्स्टोलमेन्ट अश्या दोन्ही प्रकारे करता येते. अकॉउंट उघडल्यावर पुढचे 15 वर्ष यामध्ये पैसे जमा करण्याची परवानगी आहे तर अकॉउंट उघडल्यानंतर जास्तीतजास्त 21 वर्ष यामध्ये आपण पैसे ठेऊ शकतो. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर किंवा 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर, तिला सुकन्या समृद्धी खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी 50% रक्कम काढण्याची परवानगी आहे. मात्र, हे पैसे केवळ मुलीच्या शिक्षणाच्या खर्चासाठी काढता येतील.

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आपण मुलीच्या भवितव्यासाठी गुंतवणूक करतो, त्यामुळे शक्यतो मुदतीआधी पैसे काढू नये, असा आमचा सल्ला आहे. मात्र, काही कारणास्तव यातून पैसे काढायची वेळ आली, तर त्या संदर्भात काय नियम आहेत, ते आता जाणून घेऊया. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडल्यानंतर 5 वर्षांनी मॅच्युरिटीच्या आधी पैसे काढण्याची परवानगी आहे. यामध्ये खातेदाराचा मृत्यू, खातेदाराला गंभीर आजार झाला किंवा खातं चालवणाऱ्या पालकांचं निधन झालं तर या कारणांसाठी पैसे काढता येतात. इतर इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत सुकन्या समृद्धी योजनेवर चांगला रिटर्न मिळतो. जानेवारी ते मार्च 2024 साठी सरकारने 8.2% व्याजदर निश्चित केला आहे. प्रत्येक त्रैमासिकात सरकार नवीन व्याजदर जाहीर करतं, मात्र ऐतिहासिक व्याजदराचा विचार केल्यास सुकन्या समृद्धी योजनेवर आतापर्यंत 7.6 ते 9.2% व्याजदर मिळाला आहे, जो इतर इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत बऱ्यापैकी जास्त आहे. जर मोहितने सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 15 वर्षांसाठी दर वर्षी दिढ लाख किंवा दर महिन्याला 12500 रुपयाची गुंतवणूक केली आणि त्याला या गुंतवणुकीवर 8% व्याज मिळालं तर तर 21 व्या वर्षी त्याला साधारण 70 लाख रुपये मिळतील. या पैशाचा वापर करून तो त्याच्या मुलीला अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी आरामात पाठवू शकतो आणि त्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो. विशेष म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेवर सरकारने EEE टॅक्स बेनिफिट दिला आहे. EEE टॅक्स बेनिफिट म्हणजे मोहितने दर वर्षी दिढ लाख रुपयाची गुंतवणूक केली कि त्याला सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळेल. तसेच, दर वर्षी जे व्याज जमा होईल त्यावर देखील कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही आणि मॅच्युरिटीनंतर जी रक्कम मिळेल तीदेखील पूर्णपणे टॅक्स फ्री असेल. मुलीच्या शिक्षणासाठी आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर सुकन्या समृद्धी योजना हा सर्वात चांगला पर्याय आहे.

Published: March 4, 2024, 17:27 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App