जुन्या गुंतवणुकीचा आढावा घेणं का महत्वाचं आहे?

कोणाचं तरी बघून कोणताही विचार न करता गुंतवणुकीचा निर्णय घेणं धोकादायक आहे. त्याच बरोबर, आपण याआधी कुठे गुंतवणूक केली आहे, कोणत्या ऍसेटमध्ये आपले किती पैसे आहेत आणि कोणत्या गुंतवणुकीवर आपल्याला किती रिटर्न मिळाला आहे, याचा विचार आपण नवीन गुंतवणूक चालू करताना केला पाहिजे. आपण केलेली कोणतीही नवीन गुंतवणूक ही जुन्या गुंतवणुकीला कॉम्प्लिमेंट झाली पाहिजे.

हिरेन आणि नदीम ऑफिसमध्ये बसले होते. हिरेन त्याच्या फायनान्शिअल प्लॅनिंग रिपोर्टमध्ये काहीतरी लिहीत होता. तू हे काय करतोयस, असं नदीमने हिरेनला विचारलं. एप्रिल महिन्यात इन्क्रिमेंट लेटर येईल, त्यानंतर आपल्याला SIP ची रक्कम वाढवायची आहे, म्हणून मी जुना फायनान्शिअल प्लॅनिंग रिपोर्ट बघतोय, असं हिरेन म्हणाला. अरे हिरेन, पण अजून किती पगारवाढ होणार आहे, तेच आपल्याला माहित नाहीये. मग हा जुना रिपोर्ट बघून आता काय फायदा आहे, असं नदीमने विचारलं. नवीन गुंतवणूक चालू करताना जुन्या गुंतवणुकीचा रिव्यू करायला पाहिजे, असं मला माझ्या आर्थिक सल्लागाराने सांगितलं होतं, म्हणून मी जुन्या पोर्टफोलिओचा रिव्यू करतोय, असं हिरेन नदीमला सांगतो.

हिरेन जे म्हणाला ते 100% बरोबर आहे. बरेच गुंतवणूकदार जस जसा पगार वाढेल, तसं नवीन गुंतवणूक चालू करतात. इंश्युरन्स एजंट, बँक RM किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर सांगेल त्याप्रमाणे बरेच लोकं गुंतवणूक करतात. काही लोकं तर मित्राने किंवा नातेवाईकाने गुंतवणूक केली, म्हणून कोणताही विचार न करता तशीच गुंतवणूक करतात. मात्र, प्रत्येकाचं उत्पन्न, खर्च, आयुष्याचा टप्पा आणि जोखीम घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे, कोणाचं तरी बघून कोणताही विचार न करता गुंतवणुकीचा निर्णय घेणं धोकादायक आहे. त्याच बरोबर, आपण याआधी कुठे गुंतवणूक केली आहे, कोणत्या ऍसेटमध्ये आपले किती पैसे आहेत आणि कोणत्या गुंतवणुकीवर आपल्याला किती रिटर्न मिळाला आहे, याचा विचार आपण नवीन गुंतवणूक चालू करताना केला पाहिजे. आपण केलेली कोणतीही नवीन गुंतवणूक ही जुन्या गुंतवणुकीला कॉम्प्लिमेंट झाली पाहिजे.

आपल्याकडे रिअल इस्टेट, सोनं, FD, म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स असे 5 महत्वाचे ऍसेट्स आहेत. सगळ्यात आधी आपल्याला या प्रत्येक ऍसेटमध्ये किती एलोकेशन असावं, ते ठरवावं लागेल. समजा रिअल इस्टेटमध्ये 50%, FD मध्ये 20% आणि सोनं, म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये प्रत्येकी 10% असं ऍसेट एलोकेशन करायचं आपण ठरवलं असेल, तर काही ठराविक कालावधीनंतर आपल्याला या ऍसेट एलोकेशनचा आढावा घ्यावा लागेल. दर वर्षी काही ऍसेटमध्ये खूप चांगला रिटर्न मिळतो तर काही ऍसेट्समध्ये तुलनेने कमी रिटर्न मिळतो. ज्या ऍसेटमध्ये जास्त रिटर्न मिळाला आहे, त्याचं वेटेज आपोआप वाढतं. मग अश्या परिस्थिती आपल्याला त्या ऍसेटमध्ये एवढं वेटेज चालेल का, याचा विचार केला पाहिजे. उदारणार्थ, मागच्या एक वर्षात शेअर मार्केट आणि इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये खूप चांगला रिटर्न मिळाला आहे. त्यामुळे, या 2 ऍसेट्सचं वेटेज प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये वाढलं आहे. आता जर गुंतवणूकदाराने पुन्हा याच ऍसेटमध्ये नवीन गुंतवणूक केली तर ओव्हर एलोकेशन होईल. म्हणूनच आपणदेखील हिरेनप्रमाणे नवीन गुंतवणूक चालू करताना जुन्या गुंतवणुकीचा आढावा घेतला पाहिजे.

पोर्टफोलिओमध्ये इक्विटीचं वेटेज वाढलं असेल तर हिरेन आता डेट फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो. रिजर्व बँकेने जर पुढच्या 3 वर्षात व्याजदर कमी केले, तर लॉन्ग टर्म डेट फंड्सवर 10 टक्यापेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतो. त्याचप्रमाणे, MCX वर गोल्डने ब्रेकआऊट दिला आहे, त्यामुळे सोन्याच्या किमती आता बऱ्यापैकी वाढू शकतात. इक्विटी फंडमध्ये नवीन गुंतवणूक करण्यापेक्षा हिरेन सोन्यात गुंतवणूक करू शकतो. जर काही कारणास्तव शेअर मार्केटमध्ये क्रॅश आला तर हीच डेट फंड आणि सोन्यातली गुंतवणूक हिरेनच्या कामी येईल. अश्या प्रकारे आपण किमान दर सहा महिन्याला पोर्टफोलिओचा रिव्यू करायला पाहिजे. कोणत्या ऍसेटनी मागच्या 1 वर्षात किती रिटर्न दिला आहे, त्याची आकडेवारी आपल्या फायनान्शिअल प्लॅनिंग रिपोर्टमध्ये नोंदवली पाहिजे. त्यानुसार, जोखीम कमी करून रिटर्न कसा वाढवायचा याचा आपल्याला विचार करता येईल. कोणीतरी समोरून आपल्याला इंश्युरन्स, म्युच्युअल फंड्स किंवा FD विकण्यापेक्षा आपण स्वतः एनालिसिस करून आपल्याला कोणत्या ऍसेटची आता गरज आहे ते ठरवलं पाहिजे. असं केल्याने आपला पोर्टफोलिओ व्यवस्थित डायव्हर्सिफाय होईल. कोणत्याही एका ऍसेटमध्ये आपलं ओव्हर एलोकेशन होणार नाही आणि गुंतवणुकीवर आपल्याला चांगला रिटर्न मिळत राहील.

Published: March 30, 2024, 19:40 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App