5 एप्रिलच्या आधी PPF मध्ये गुंतवणूक केली तर किती फायदा मिळतो?

दर वर्षी PPF मध्ये गुंतवणूक करत असाल तर शक्यतो आर्थिक वर्ष चालू झाल्यावर 5 एप्रिलच्या आधीच गुंतवणूक करा.

मुलं त्यांच्या आई वडिलांचं अनुकरण करतात. आई वडिलांच्या गुंतवणुकीची पद्धत कशी आहे, त्याकडे मुलांचं लक्ष असतं. अनुज लहान असल्यापासून त्याचे वडील PPF मध्ये नियमित गुंतवणूक करत होते. FD, इंश्युरन्स पॉलिसी, म्युच्युअल फंड्स, शेअर्स, रिअल इस्टेट किंवा सोन्यातल्या गुंतवणुकीवर अनुजच्या वडिलांचा फारसा विश्वास नव्हता. मात्र, PPF म्हणजेच पब्लिक प्रोविडेंट फंड हा त्यांचा ऑल टाइम फेवरेट पर्याय होता. पुढे अनुजला नोकरी लागली आणि त्यानेदेखील PPF मध्ये गुंतवणूक चालू केली. अनुज, तु पहिल्या पगारापासून गुंतवणूक चालू केली आहेस, याबद्दल तुझं कौतुक आहे. मात्र, गुंतवणुकीत सातत्य ठेव असा सल्ला अनुजच्या वडिलांनी त्याला दिला. तसेच, PPF मध्ये गुंतवणूक करायची असेल तर दर वर्षी 1 ते 5 एप्रिलमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न कर. पण प्रत्येक आर्थिक वर्षात 1 ते 5 एप्रिल दरम्यानच गुंतवणूक करण्याचा सल्ला अनुजच्या वडिलांनी का दिला, हा महत्वाचा प्रश्न आहे. चला तर यामागचं लॉजिक समजून घेऊया.

बरेच गुंतवणूकदार PPF मध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान गुंतवणूक करतात. जानेवारी महिना चालू झाला कि कंपनीच्या HR कडून गुंतवणुकीच्या प्रूफची मागणी केली जाते. आर्थिक वर्ष चालू होताना आपण डिक्लेरेशन तर दिलेलं असतं, मात्र कामाच्या गडबडीत गुंतवणूक करण्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. मग जानेवारी महिन्यात कंपनीला प्रूफ सादर करायचे असतात, त्यानंतर आपली धावपळ चालू होते. मात्र, असं न करता आपण आर्थिक वर्ष चालू होतानाच गुंतवणूक केली तर तेवढ्या वर्षाचं व्याज आपल्याला मिळेल. PPF मध्ये कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो, म्हणजे या इन्स्ट्रुमेंटमध्ये व्याजावर व्याज दिलं जातं. त्यामुळे, आपण आर्थिक वर्ष चालू झाल्यावर लगेचच गुंतवणूक केली तर संबंध वर्षाचं व्याज आपल्याला मिळेल आणि पुढचे 15 वर्ष त्या व्ययावर व्याज आपल्याला मिळत राहील. त्याच बरोबर, कोणत्याही महिन्यात आपल्याला PPF मध्ये गुंतवणूक करायची असेल तर शक्यतो महिन्याच्या 5 तारखेच्या आधी गुंतवणूक केली पाहिजे. असं केल्याने आपल्याला त्या महिन्याचं पूर्ण व्याज मिळेल. जर गुंतवणूकदाराने महिन्याच्या 5 तारखेनंतर गुंतवणूक केली तर त्याला दुसऱ्या महिन्यापासून व्याज दिलं जातं.

दर वर्षी 1 ते 5 एप्रिल दरम्यान गुंतवणूक केली तर अनुजला नक्की किती फायदा होईल, त्याचं आता कॅल्क्युलेशन करूया. अनुजने दर वर्षी PPF मध्ये दिढ लाख रुपयाची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढचे 15 वर्ष तो ही गुंतवणूक करणार आहे. अनुजने 1 ते 5 एप्रिल दरम्यान PPF मध्ये दिढ लाख रुपये जमा केले तर त्याला पूर्ण वर्षाचं व्याज मिळेल. त्याच्या PPF गुंतवणुकीवर त्याला 10650 रुपये व्याज मिळेल,……. कारण PPF वर सध्या 7.1% व्याजदर आहे. अनुजने गुंतवणूक करायला थोडा उशीर केला, आणि 5 एप्रिल ऐवजी त्याने 7 एप्रिलला गुंतवणूक केली तर त्याला केवळ 11 महिन्याचं व्याज मिळेल, हा आकडा आहे 9762 रुपये……… म्हणजे केवळ 2 दिवस उशीर केला म्हणून त्याला 888 रुपये कमी व्याज मिळालं. आता तुम्ही म्हणाल कि 888 रुपयाने असा काय फरक पडणार आहे. 888 रुपये हे पहिल्या वर्षाचं नुकसान आहे, हे व्याज कमी मिळाल्यामुळे, तिथून पुढे 14 वर्ष या व्याजावर व्याज देखील मिळणार नाही. या 888 रुपयाची 15 वर्षानंतर व्हॅल्यू होईल 2320 रुपये. असा जर एकूण 15 वर्षाचं विचार केला तर हा आकडा 20 ते 25 हजार रुपयाच्या वर जाईल. आपण 1 ते 5 एप्रिल दरम्यान PPF मध्ये गुंतवणूक केली तर त्या वर्षाचं व्याज आणि व्याजावरचं व्याज असे 2 फायदे आपल्याला मिळतील. त्यामुळे, तुम्हीदेखील दर वर्षी PPF मध्ये गुंतवणूक करत असाल तर शक्यतो आर्थिक वर्ष चालू झाल्यावर 5 एप्रिलच्या आधीच गुंतवणूक करा.

Published: April 1, 2024, 17:05 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App