Mediclaim Policy चा क्लेम रिजेक्ट झाला तर काय करावं?

कंपनीने क्लेम रिजेक्ट केला पण कंपनी विरोधात आपल्याला कुठे तक्रार करावी लागेल, तक्रार करून न्याय मिळेल का आणि त्यासाठी किती खर्च येईल, असे अनेक प्रश्न अथर्वच्या मनात आहेत. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.

अथर्वने बायको, मुलं आई वडील आणि स्वतःसाठी एका नामांकित हेल्थ इंश्युरन्स कंपनीकडून मेडिक्लेम पॉलिसी खरेदी केली होती. 25 लाखाच्या सम अश्युर्डसाठी तो दर वर्षी 1 लाख 20 हजार रुपये प्रीमियम भरत होता. पॉलिसी खरेदी करून 5 वर्ष पूर्ण झाले आहेत, त्यामुळे पॉलिसीमध्ये असणारे सर्व वेटिंग पिरिअड आता संपले आहेत, तसेच मागच्या 5 वर्षात त्याने एकदाही क्लेम केला नाही, त्यामुळे कंपनीने त्याला 50% नो क्लेम बोनस दिला आहे. म्हणजे आता त्याच्याकडे 37 लाख 50 हजारचा मेडिक्लेम कव्हर आहे. आपल्याकडे पुरेसा मेडिक्लेम कव्हर आहे आणि आता वेटिंग पिरिअड संपला आहे म्हणून अथर्व निश्चिंत होता. मात्र अचानक एके दिवशी त्याच्या वडिलांना हार्ट ऍटॅक आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. सुरुवातीचे काही दिवस ते ICU मध्ये होते, नंतर तब्बेतीमध्ये सुधारणा झाली आणि त्यांना रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. 20 दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. हॉस्पिटलचं बिल 15 लाखाच्या वर गेलं होतं, पण आपल्याकडे मेडिक्लेम पॉलिसी आहे म्हणून अथर्वला बिलाची काळजी नव्हती. नंतर त्याने क्लेमसाठी इंश्युरन्स कंपनीकडे अर्ज केला पण कंपनीने त्याचा क्लेम रिजेक्ट केला. आपला क्लेम रिजेक्ट झाला आहे आणि आता हे 15 लाख रुपये आपल्याला मिळणार नाही, हे ऐकून अथर्वला धक्का बसला. कंपनीने क्लेम रिजेक्ट केला पण कंपनी विरोधात आपल्याला कुठे तक्रार करावी लागेल, तक्रार करून न्याय मिळेल का आणि त्यासाठी किती खर्च येईल, असे अनेक प्रश्न अथर्वच्या मनात आहेत. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.

बऱ्याच इंश्युरन्स कंपन्या सुरुवातीला ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी कमी प्रीमियम आकारतात, तसेच आकर्षक फीचर्स पॉलिसीमध्ये ऍड करतात. मात्र, नंतर क्लेम वाढायला लागले कि कंपन्यांना नुकसान होतं. हे नुकसान कमी करण्यासाठी कंपन्यांकडे 2 पर्याय असतात, प्रीमियम वाढवणं हा एक पर्याय त्यांच्याकडे असतो आणि दुसरा पर्याय म्हणजे क्लेमसाठी जास्त पैसे खर्च न करणं. जर प्रीमियम वाढवला तर ग्राहक नाराज होतात आणि पॉलिसी पोर्ट करतात, त्यामुळे कंपनीच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होतो. हा पर्याय शक्य नसल्यामुळे कंपन्या क्लेमवर होणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतात. क्लेम आला कि कोणतातरी नियम दाखवून तो रिजेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. पॉलिसी खरेदी करताना तुम्ही माहिती लपवली किंवा हा आजार पॉलिसीमध्ये कव्हरचं होत नाही, असे कारणं देऊन क्लेम रिजेक्ट केला जातो. क्लेम मिळणार नाही म्हणून आपण उपचार थांबवू शकत नाही. बचत मोडून किंवा कर्ज काढून आपल्याला उपचारासाठी खर्च करावाच लागतो. एका बाजूला दर वर्षी मेडिक्लेमचा प्रीमियम भरा, नंतर क्लेम नाही मिळाला म्हणून कर्ज काढा आणि अनेक वर्ष त्याचे EMI भरा हा सगळा उद्योग नागरिकांना करावा लागतो आणि विनाकारण मनस्ताप होतो. आपल्या बाबतीत असं होऊ नये यासाठी आपण काही काळजी घेऊ शकतो.

हेल्थ इंश्युरन्स खरेदी करताना सगळ्यात पहिला मुद्दा आपण लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे हेल्थ इंश्युरन्स ही काटकसर करण्याची गोष्ट नाहीये. प्रत्येक वस्तू किंवा सर्व्हिस स्वस्तात कशी मिळेल, याकडे आपला नेहमी प्रयत्न असतो. प्रत्येक गोष्टीत काटकसर करणं ही इंडियन मेन्टॅलिटी आहे. ही चांगली सवय आहे, यामुळे आपली बचत होते, मात्र हेल्थ इंश्युरन्स खरेदी करताना आपल्याला ही मेन्टॅलिटी थोडी बाजूला ठेवावी लागेल. स्वस्त मिळणारी हेल्थ इंश्युरन्स पॉलिसी स्वस्त असते कारण त्यात फीचर्स कमी असतात. सगळे आजार जर त्या पॉलिसीमध्ये कव्हर झाले नाही तर नंतर क्लेम रिजेक्ट होऊ शकतो आणि मग खिशातून पैसे भरण्याची वेळ येते. त्यामुळे, प्रीमियमवर थोडे जास्त पैसे गेले तरी हरकत नाही, पण चांगली मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करा. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, एजंट किंवा रिलेशनशिप मॅनेजर हे लोकं पॉलिसी विकण्याची घाई करतात. त्यांना त्यांचं टार्गेट पूर्ण करायचं असतं, त्यामुळे काहीतरी करून पॉलिसी विकायची एवढंच त्यांचं ध्येय असतं. मात्र, त्यांची ही घाई आपल्याला महागात पडू शकते. त्यामुळे, समोरच्याने कितीही घाई केली तरी आपण सगळी माहिती घेऊनचं पॉलिसी खरेदी केली पाहिजे. तसेच, कधीही ब्लँक फॉर्मवर सही करू नका. फॉर्म आधी व्यवस्थित वाचा, तो फॉर्म स्वतः भरा आणि मगच त्यावर सही करा. त्यानंतर, फॉर्मची झेरॉक्स काढून ठेवा. पॉलिसी इश्यू झाल्यावर काही कंपन्या फॉर्मची कॉपी आपल्याला देतात. आपण भरलेला फॉर्म आणि कंपनीने दिलेला फॉर्म एकच आहे का त्याची खात्री करा. जुन्या आजाराची माहिती फॉर्ममध्ये भरली नसेल तर क्लेम रिजेक्ट होऊ शकतो.

बरेच लोकं 500 1000 रुपये वाचावे म्हणून ऑनलाईन पॉलिसी खरेदी करतात. आपल्या पॉलिसीवर एजंट पैसे कमावतो म्हंटल्यावर बऱ्याच लोकांना ते सहन होत नाही. केवळ एजंटला पैसे मिळू नये म्हणून बरेच लोकं ऑनलाईन पॉलिसी खरेदी करतात. मात्र, क्लेम मिळवताना हाच एजंट तुमची मदत करू शकतो. त्यामुळे, कमिशन वाचवण्यापेक्षा एजंटची आपल्याला जी मदत होणार आहे, त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. फॉर्ममध्ये जुन्या आजारांची माहिती व्यवस्थित भरली असेल, चांगली पॉलिसी खरेदी केली असेल आणि एजंटने व्यवस्थित सर्व्हिस दिली तर क्लेम रिजेक्ट होण्याची शक्यता खूप कमी असते. एवढं करून क्लेम रिजेक्ट झाला तर सगळ्यात आधी आपण कंपनीच्या GRO म्हणजेच ग्रीवियन्स रीड्रेसल ऑफिसरकडे तक्रार करू शकतो. त्यावर इंश्युरन्स कंपनीला 15 दिवसात निर्णय द्यावा लागेल. जर निकाल तुमच्या बाजूने नाही लागला तर तुम्ही IRDAI कडे तक्रार करू शकता. यासाठी बिमा भरोसा पोर्टलचा आपण वापर करू शकतो किंवा इंश्युरन्स ओम्बड्समनकडे तक्रार करण्याचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. क्लेम रिजेक्ट झाल्यानंतर आपल्याला 1 वर्षाच्या आत ओम्बड्समनकडे तक्रार करावी लागेल.

Published: April 5, 2024, 11:50 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App