10000 रुपयाची SIP करून जमा करा 4 कोटींचा फंड !

अमितला एकूण 4 कोटींचा कॉर्पस जमा करावा लागणार आहे. यासाठी अमितला दर महिन्याला किती रुपयाची SIP करावी लागेल, तसेच तेवढी SIP त्याला आत्ता करणं शक्य नसेल तर काय करावं लागेल, या 2 महत्वाच्या प्रश्नांचे उत्तरं आता जाणून घेऊया.

अमितला रिटायरमेंट प्लँनिंग आणि मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी गुंतवणूक चालू करायची आहे. अमितचं वय 35 आहे तर त्याची मुलगी 3 महिन्यांची आहे. मुलीला चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर सध्याच्या काळात किमान 10 ते 15 लाख रुपये लागतात, तेवढाच खर्च लग्नासाठी देखील करावा लागतो. महागाईचा विचार केला तर पुढच्या 20 ते 25 वर्षानंतर उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी किमान 50 50 लाख रुपयाची गरज पडेल. म्हणजे अमितला मुलीसाठी 25 वर्षानंतर 1 कोटींचा कॉर्पस जमा करावा लागेल. अमित एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतोय, त्यामुळे त्याला सरकारी पेन्शन मिळणार नाहीये. रिटायरमेंटनंतर लाईफस्टाईल चांगली ठेवायची असेल तर त्याला मोठा फंड जमा करावा लागेल. सर, तुम्हाला रिटायर व्हायला आणखी 25 वर्ष आहेत, पण त्या वेळेला महागाई खूप वाढलेली असेल, त्यामुळे तुमच्याकडे किमान 3 कोटींचा रिटायरमेंट फंड पाहिजे, असं अमितच्या आर्थिक सल्लागाराने सांगितलं. मुलीचं शिक्षण आणि स्वतःची रिटायरमेंट या दोन्हीही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अमितला एकूण 4 कोटींचा कॉर्पस जमा करावा लागणार आहे. यासाठी अमितला दर महिन्याला किती रुपयाची SIP करावी लागेल, तसेच तेवढी SIP त्याला आत्ता करणं शक्य नसेल तर काय करावं लागेल, या 2 महत्वाच्या प्रश्नांचे उत्तरं आता जाणून घेऊया.

अमितकडे गुंतवणुकीसाठी 25 वर्षाचा कालावधी आहे, या दरम्यान त्याला 4 कोटींचा फंड जमा करायचा आहे. त्याचा कालावधी मोठा असल्यामुळे तो इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो. इक्विटी फंडवर सध्या सरासरी 15% रिटर्न मिळतोय. मात्र, जस जशी भारताची अर्थव्यवस्था विकसित होत जाईल, तसं GDP वाढीचा आणि महागाईचा दर कमी होईल. त्यामुळे, अमितला पुढच्या 25 वर्षात साधारण 12% रिटर्न मिळू शकतो. जर 12% रिटर्न मिळणार असेल आणि 25 वर्षानंतर 4 कोटींचा कॉर्पस जमा करायचा असेल तर अमितला दर महिन्याला साधारण 24 हजार रुपयाची SIP चालू करावी लागेल. मात्र, अमितचा पगार सध्या कमी आहे. त्यातच घर आणि कारचा EMI चालू आहे. त्यामुळे, अमितला लगेच 24 हजार रुपयाची SIP चालू करणं शक्य नाहीये, तो सध्या दर महिन्याला 10 हजार रुपयाची SIP चालू करू शकतो. आत्ता जर गुंतवणूक चालू नाही केली तर काहीच साध्य होणार नाही आणि जरी गुंतवणूक चालू केली तर अर्धवट कॉर्पस जमा होईल. अमितसारखीच परिस्थिती आपल्यापैकी अनेकांची असते. आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल ते आपल्याला माहित असतं, तेवढी गुंतवणूक करण्याची आपली इच्छा असते. मात्र, सध्याचे खर्च आणि EMI मुळे ते शक्य होत नाही. आपल्याला शक्य झालं कि मग भविष्यात गुंतवणूक चालू करू, असा आपण विचार करतो. गुंतवणुकीचा मुहूर्त काही केलं तरी आपल्याला सापडत नाही. मात्र, अमितसाठी एक आनंदाची बातमी आहे. तो 10000 रुपयाची SIP चालू करून 4 कोटींचा कॉर्पस जमा करू शकतो, पण हे कसं शक्य आहे? चला तर मग जाणून घेऊया.

अमितसारख्या लाखो तरुणांच्या अडचणींवर एक उपाय आहे, ज्याचं नाव आहे स्टेप अप SIP. दर वर्षी SIP च्या रकमेत वाढ केली तर त्याला स्टेप अप SIP म्हणतात. स्टेप अप SIP चा फायदा असा आहे कि आपल्याला SIP चालू करतानाच दर वर्षी SIP च्या रकमेत किती वाढ करायची आहे, ते ठरवता येतं. यामध्ये आपण दर वर्षी किती रक्कम वाढवायची आहे ती रक्कम सांगू शकतो किंवा वाढीची टक्केवारी सांगू शकतो. समजा अमितने SIP मध्ये दर वर्षी 1000 रुपयाची वाढ करायचं निश्चित केलं, तर पहिल्या वर्षी 10000 दुसऱ्या वर्षी 11000 तिसऱ्या वर्षी 12000 अश्या पद्धतीने दर वर्षी SIP ची रक्कम ऑटोमॅटिक वाढत जाईल. अमितकडे दुसरा पर्याय तो म्हणजे वाढीची टक्केवारी निश्चित करण्याचा. समजा अमितला दर वर्षी SIP ची रक्कम 10 टक्याने वाढवायची असेल, तर पहिल्या वर्षी 10000 रुपये, दुसऱ्या वर्षी 11 हजार रुपये, तिसऱ्या वर्षी 12 हजार 100 रुपये अश्या पद्धतीने SIP ची रक्कम वाढत जाईल. समजा अमितने 10000 रुपयाची नॉर्मल SIP चालू केली तर 25 वर्षानंतर त्याला 1 कोटी 70 लाखाचा कॉर्पस मिळेल. मात्र, त्याने 10000 रुपयाची स्टेप अप SIP चालू केली आणि दर वर्षी 10% वाढ करण्याचं ठरवलं तर त्याला 25 वर्षानंतर 3 कोटी 93 लाखाचा फंड मिळेल. अश्या प्रकारे आपण गुंतवणुकीचं टेन्शन न घेता स्टेप SIP च्या मदतीने अवघड वाटणारं उद्दिष्ट सहज पूर्ण करू शकतो.

Published: April 10, 2024, 11:26 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App