गुंतवणूक लवकर चालू करण्याचे फायदे

प्रत्येकाने उत्पन्नाच्या किमान 20% रक्कम दीर्घकालाईन गुंतवणुकीसाठी वापरली पाहिजे, त्याच बरोबर ही गुंतवणूक लवकर चालू आवश्यक आहे. लवकर गुंतवणूक चालू केली तर काय फायदा होतो, ते आता जाणून घेऊया.

कोणत्याही गोष्टीची सुरुवात केल्याशिवाय ती गोष्ट साध्य होऊ शकत नाही. पेरल्याशिवाय उगवणार नाही, तसंच गुंतवणूक चालू केल्याशिवाय वेल्थ क्रिएट करता येणार नाही. भारतीय गुंतवणूकदार मागच्या काही वर्षात गुंतवणुकीसंदर्भात बऱ्यापैकी सिरिअस झाले आहेत. मात्र, तरीही एकूण गुंतवणूकदारांच्या तुलनेत हा आकडा कमीच आहे. अनेक तरुण मुलं नोकरी लागल्यावर भारी स्मार्टफोन, ब्रँडेड कपडे, मग कार, फॉरेन ट्रिप यासारख्या गोष्टींवर अमाप खर्च करतात. आपल्या हातात चांगला फोन असेल, आपल्याकडे पॉश कार असेल, आपण नियमित विदेशात ट्रिपला जात असू तर समाजात कौतुक होतं. त्यामुळे, लोकांना यावर खर्च करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. तुम्ही नवीन IPhone खरेदी केला तर तुमचे मित्र तुमचं खूप कौतुक करतील, चार चौघात तुमची कॉलर टाईट होईल, पण तुम्ही जर दर महिन्याला 50000 रुपयाची गुंतवणूक करत असाल तर एकही मित्र तुमचं कौतुक करणार नाही. त्यामुळे, गुंतवणूक चालू करणाऱ्यांचं समाजात फारसं कौतुक होतं नाही, त्यामुळे लोकांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळे, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगला फार गांभीर्याने घेत नाही. बाकीचे स्वप्न पूर्ण झाल्यावर थोडे पैसे शिल्लक राहिले तर आपण थोडीफार गुंतवणूक करतो. मात्र, ही आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक असू शकते. प्रत्येकाने उत्पन्नाच्या किमान 20% रक्कम दीर्घकालाईन गुंतवणुकीसाठी वापरली पाहिजे, त्याच बरोबर ही गुंतवणूक लवकर चालू आवश्यक आहे. लवकर गुंतवणूक चालू केली तर काय फायदा होतो, ते आता जाणून घेऊया.

वॉरन बफे यांनी वयाच्या 11 व्या वर्षी पहिला शेअर खरेदी केला. पण मला गुंतवणूक चालू करण्यासाठी उशीर झाला, अशी खंत वॉरन बफे नेहमी व्यक्त करतात. आपण 11 व्या वर्षी नाहीतर कमीत कमी 25 किंवा 30 व्या वर्षी गुंतवणूक चालू केली पाहिजे. प्रत्येकाचं रिटायरमेंटचं वय निश्चित आहे, साधारण 58 किंवा 60 वर्ष वय झाल्यावर आपला ऍक्टिव्ह इन्कम बंद होतो. मग आपण साठवलेल्या पैशातून जो पॅसिव्ह इन्कम मिळणार आहे त्याच पैशावर आपल्याला उदरनिर्वाह करायचा असतो. म्हणूनच आपण जर लवकर गुंतवणूक चालू केली तर गुंतवणुकीसाठी आपल्याला जास्त कालावधी मिळतो. समजा रोहितने म्युच्युअल फंडमध्ये 1 लाख रुपयाची एकरकमी गुंतवणूक केली आणि त्यावर त्याला वार्षिक 15% रिटर्न मिळाला, तर 10 वर्षानंतर त्याच्या गुंतवणुकीचं मूल्य होईल 4 लाख 4 हजार रुपये. म्हणजे त्याचे पैसे 4 पट झाले, त्याला साधारण 3 लाख रुपयाचा फायदा झाला. त्याने जर ही गुंतवणूक 20 वर्षानंतर काढली तर त्याला 16 लाख 36 हजार रुपये मिळतील, याचा अर्थ त्याला 15 लाख 36 हजार रुपयाचा फायदा झाला. आता इथे एका महत्वाच्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, ती म्हणजे रोहितचा गुंतवणुकीचा कालावधी दुप्पट झाला पण त्याला मिळणार फायदा 5 पट वाढला. जो गुंतवणूकदार लवकर गुंतवणूक चालू करेल, त्याला कंपाऊंडिंगसाठी जास्त कालावधी मिळेल आणि अर्थातच त्याची जास्त वेल्थ क्रिएट होईल. हीच 1 लाख रुपयाची गुंतवणूक रोहितने 30 वर्षानंतर काढली तर त्याला 66 लाख 20 हजार रुपये मिळतील आणि गुंतवणूक 40 वर्ष होल्ड केली तर 1 लाखाच्या गुंतवणुकीचं मूल्य होईल तब्बल 2 कोटी 67 लाख रुपये. आपण गुंतवणूक चालू करण्यासाठी जेवढा उशीर करू, तेवढा आपल्याला कंपाऊंडिंगसाठी कमी कालावधी मिळेल आणि आपल्याला कमी प्रॉफिट मिळेल.

आता SIP लवकर चालू करण्याचे फायदे काय आहेत, ते जाणून घेऊया. समजा रोहितचं वय 25 आहे आणि अमितचं वय आहे 40. दोघांनाही वयाच्या साठाव्या वर्षी 1 कोटींचा कॉर्पस जमा करायचा आहे. रोहितचं वय 25 आहे, त्यामुळे त्याच्याकडे 35 वर्षांचा कालावधी आहे. त्याला जर इक्विटी फंड्सवर वार्षिक 15% रिटर्न मिळाला तर वयाच्या साठाव्या वर्षी 1 कोटींचा फंड जमा करण्यासाठी त्याला केवळ 900 रुपयाची SIP करावी लागेल. दुसऱ्या बाजूला अमितचं वय 40 आहे, म्हणजे त्याच्याकडे गुंतवणुकीसाठी 20 वर्षांचा कालावधी आहे. अमितला वार्षिक 15% रिटर्न मिळाला आणि वयाच्या साठाव्या वर्षी 1 कोटींचा फंड जमा करायचा असेल तर त्याला साधारण 7500 रुपयाची SIP करावी लागेल. रोहितने 35 वर्षांसाठी 7500 रुपयाची सिप केली तर त्याला 8 कोटी 57 लाख रुपये मिळतील. याचा अर्थ रोहितने जर लवकर गुंतवणूक चालू केली, तर त्याला खूप कमी गुंतवणूक करावी लागेल. त्याने अमित एवढीच गुंतवणूक केली तर त्याला अमितपेक्षा 7 कोटी 57 लाख रुपये जास्त मिळतील. मित्रांनो तुमचं वय 40 पेक्षा जास्त असेल आणि अजूनही तुम्ही गुंतवणूक चालू केली नसेल तर आता मात्र वेळ वाया घालवू नका. लवकरात लवकर गुंतवणूक चालू करा आणि चांगली वेल्थ क्रिएट करा.

Published: May 3, 2024, 17:44 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App