लोनसाठी गॅरंटर राहण्यात कोणती रिस्क असते?

जवळचा मित्र असो किंवा नातेवाईक, कोणत्याही लोनसाठी गॅरंटर म्हणून सही करताना आपण नक्की कोणती जवाबदारी घेतोय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. जर कर्जदाराने कर्जाचे हफ्ते वेळेवर भरले नाहीतर बँक गॅरंटरकडून सगळे पैसे वसूल करते. कर्जदाराला कर्जाची परतफेड करता आली नाहीतर बाकीचे सगळे EMI गॅरंटरला भरावे लागतात.

अजय सध्या अडचणीत सापडला आहे. त्याने एका मित्राच्या लोनसाठी गॅरंटर म्हणून सही केली आणि त्याला या निर्णयाचा पश्चाताप होतोय. अजयच्या एका जवळच्या मित्राला पर्सनल लोन घ्यायचं होतं. अजयच्या मित्राचा लहान व्यवसाय आहे, मात्र त्याने आजपर्यंत IT रिटर्न किंवा बॅलन्स शीट बनवून घेतले नाही. त्याच्या इन्कम डॉक्युमेंट नसल्यामुळे बँक त्याला लोन सॅंक्शन करायला तयार नव्हती. मात्र, तुम्ही जर एखादा पगारदार गॅरंटर आणला तर आम्ही तुम्हाला लगेच कर्ज देऊ असं बँकेने सांगितलं. अजयच्या मित्राचं पूर्वी पुण्यातल्या कर्वेनगरमध्ये एक स्नॅक्स सेंटर होतं. मात्र, त्याला शॉप भाड्याने घेऊन चांगलं हॉटेल चालू करायचं होतं, म्हणूनच त्याने लोन घेण्याचा निर्णय घेतला. माझ्या लोनसाठी तू गॅरंटर म्हणून सही करशील का, असं मित्राने अजयला विचारलं. आपला जवळचा मित्र आहे, त्याचा व्यवहार देखील चांगला आहे, आपण गॅरंटर म्हणून सही केली तर मित्राचा व्यवसाय वाढेल आणि त्याच्या प्रगतीमध्ये आपला हातभार लागेल, या हेतूने अजयने गॅरंटर म्हणून सही केली. कर्ज घेऊन अजयच्या मित्राने हॉटेल चालू केलं, मात्र दुकानाचं भाडं, कर्मचाऱ्यांच्या पगार आणि इतर खर्चाच्या तुलनेत त्याचा व्यवसाय चांगला होतं नव्हता. नंतर खूपच नुकसान होऊ लागलं, त्यामुळे त्याला दुर्दैवाने हॉटेल बंद करावं लागलं. हातात पैसे शिल्लक नव्हते त्यामुळे EMI भरणं त्याने बंद केलं.

अजयकडून आपल्या लोनची रिकव्हरी होणार नाही, हे लक्षात आल्यावर बँकेने अजयच्या खात्यातून EMI डेबिट करायला सुरुवात केली. आता अजयला स्वतःच घर घ्यायचं आहे, पण मित्राचा EMI त्याच्या पगारातून जातोय त्यामुळे त्याला होम लोन मिळत नाहीये. अजयसारखीच परिस्थिती आपल्यापैकी अनेकांची होऊ शकते. जवळचा मित्र असो किंवा नातेवाईक, कोणत्याही लोनसाठी गॅरंटर म्हणून सही करताना आपण नक्की कोणती जवाबदारी घेतोय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. जर कर्जदाराने कर्जाचे हफ्ते वेळेवर भरले नाहीतर बँक गॅरंटरकडून सगळे पैसे वसूल करते. कर्जदाराला कर्जाची परतफेड करता आली नाहीतर बाकीचे सगळे EMI गॅरंटरला भरावे लागतात. गॅरंटरला सही करताना त्याच्या सॅलरी अकॉउंट किंवा सेविंग अकॉउंटची माहिती द्यावी लागते. त्यामुळे, लोन अकॉउंट NPA होणार हे बँकेच्या लक्षात आल्यावर बँक गॅरंटरच्या खात्यातून पैसे डेबिट करायला सुरुवात करते. आपण गॅरंटर म्हणून सही करताना जास्त विचार करत नाही. बऱ्याच वेळेला आपली सही करायची तयारी नसते पण मित्र जवळचा आहे किंवा नातं असल्यामुळे नाही कसं म्हणायचं, असा विचार आपण करतो आणि नाईलाजाने सही करतो. मित्र किंवा नातेवाईकांसाठी गॅरंटर होण्यामध्ये काहीच गैर नाहीये. मात्र, आपला मित्र किंवा नातेवाईक कशासाठी कर्ज घेतोय, कर्जाची रक्कम किती आहे, परतफेडीचा कालावधी किती आहे, कर्जाचा व्याजदर किती आहे, तो कर्जाची परतफेड व्यवस्थित करेल का, यासारख्या गोष्टींचा विचार करून सही केली पाहिजे.

आपला मित्र किंवा नातेवाईक कर्जाची परतफेड करेल का, याबद्दल जर तुम्हाला शंका असेल तर सही करू नका. सुरुवातीला थोडा वाईटपणा येईल पण नंतर कर्जाची परतफेड नाही केली तर शेवटी वाईटपणा येईलच, शिवाय खिशातून आपल्यालाच EMI भरावे लागतील. जर आपण EMI भरायला नकार दिला तर बँक आपल्यावरदेखीक कायदेशीर कारवाई करू शकते. त्याचा आपल्या सिबिल स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. भविष्यात आपल्यावर जर लोन घेण्याची वेळ आली आणि आपला सिबिल स्कोअर खराब असेल तर आपल्याला कोणतीच बँक लोन देणार नाही. त्यामुळे, कोणत्याही लोनसाठी गॅरंटर राहण्याचा विचार करत असाल, तर विचारपूर्वक निर्णय घ्या. लोनसाठी एकूण 2 गॅरंटर असतील तर तुमची जोखीम 50 टक्याने कमी होईल. तसेच, जर लोन सिक्युरड असेल तर बँक मॉर्टगेज केलेली प्रॉपर्टी विकून पैसे वसूल करू शकते. या केसमध्ये गॅरंटरला फारसा त्रास होणार नाही. मात्र, जर लोन अन-सिक्युरड असेल आणि व्याजदर खूप जास्त असेल तर मात्र शक्यतो गॅरंटर म्हणून सही करू नका.

Published: May 4, 2024, 19:38 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App