म्युच्युअल फंड मिस-सेलिंगपासून संरक्षण कसं करायचं?

सुनीता यांचं वय 50 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे त्यांनी शक्यतो मिडीयम रिस्क किंवा लो रिस्क फंडमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, मात्र डिस्ट्रिब्युटरने त्यांना स्मॉलकॅप फंडच्या NFO मध्ये गुंतवणूक करायला लावली. नंतर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये खूप मोठी पडझड झाली आणि सुनीताला फटका बसला.

मुंबईच्या सुनीता परमार अनेक वर्षांपासून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. एके दिवशी त्यांना म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरचा फोन आला, मॅडम, नवीन फंड बाजारात आला आहे, तुम्ही या NFO मध्ये गुंतवणूक केली तर 10 रुपयाच्या NAV ला युनिट्स मिळतील, पुढच्या 5 ते 7 वर्षात या फंडमध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो, असं डिस्ट्रिब्युटरने सुनीताला सांगितलं. सध्या तरी गुंतवणूक करायची नाही, असं सुनीताने त्याला सांगितलं. मात्र, डिस्ट्रिब्युटरने बऱ्याच वेळेला कॉल केल्यामुळे सुनीताने 50000 रुपयाची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. सुनीता यांचं वय 50 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे त्यांनी शक्यतो मिडीयम रिस्क किंवा लो रिस्क फंडमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, मात्र डिस्ट्रिब्युटरने त्यांना स्मॉलकॅप फंडच्या NFO मध्ये गुंतवणूक करायला लावली. नंतर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये खूप मोठी पडझड झाली आणि सुनीताला फटका बसला.

गुंतवणूकदारांना योग्य सल्ला मिळावा, मिस-सेलिंग होऊ नये म्हणून सेबीने अनेक नियम केले आहेत. मात्र, तरीदेखील अश्या प्रकारचं मिस-सेलिंग कमी झालं नाहीये. आपलं उत्पन्न वाढावं म्हणून आर्थिक सल्लागार, म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर आणि वेल्थ मॅनेजमेंट कंपन्या मिस-सेलिंग करतात. एखादा फंड आपल्या ग्राहकांसाठी योग्य आहे का, त्याचा विचार करूनच गुंतवणुकीचा सल्ला देणं अपेक्षित असतं. मात्र, ग्राहकांसाठी योग्य नसलेला फंड त्याला विकला जातो, यालाच मिस-सेलिंग म्हणतात. यामुळे, विक्रेत्याला चांगले पैसे मिळतात मात्र गुंतवणूकदाराचं नुकसान होऊ शकतं. जर त्याला चांगला रिटर्न नाही मिळाला तर म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचं नावं खराब होतं. त्यामुळे, मिस-सेलिंगचे प्रकार कमी व्हावे अशी सेबी आणि म्युच्युअल फंड कंपन्यांची इच्छा आहे. टेक्नॉलॉजीचा वापर वाढल्यामुळे हे गैर प्रकार कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, असं काहीच झालं नाही.

गुंतवणूकदारांना मिस-सेलिंग कसं केलं जातं, ते आता जाणून घेऊया. सुनीता यांच्या बरोबर जो प्रकार झाला तो मिस-सेलिंगचा एक प्रकार आहे. त्याच बरोबर, गुंतवणूकदारांना जुने फंड विकून नवीन फंड खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. फंड स्विच करताना किती ब्रोकरेज लागेल ते ब्रोकर सांगत नाही. फंड स्विच करणं चुकीचं नाहीये, मात्र ते गुंतवणूकदाराच्या फायद्यासाठी होणं अपेक्षित आहे. केवळ आपल्याला जास्त कमिशन मिळावं म्हणून नवीन फंडची विक्री होत असेल, तर त्यामुळे गुंतवणूकदारांचं नुकसान होतं. सध्या बाजारात सेक्टर फंड्स आणि थिमेटिक फंड्सचे अनेक NFO बाजारात येत आहेत. या फंड्सवर जास्त कमिशन मिळतं, त्यामुळे या फंड्सची सर्रास विक्री होते. मात्र, गुंतवणूकदाराची खरंच एवढी जोखीम घेण्याची क्षमता आहे का, त्याचा विचार होत नाही. अश्या मिस-सेलिंगपासून वाचायचं असेल तर काय केलं पाहिजे, ते आता जाणून घेऊया. तुमच्या आर्थिक सल्लागाराने कोणताही फंड खरेदी करण्याचा सल्ला दिला तर त्यामागचं लॉजिक त्याला विचारा. तो स्वतः त्या फंडमध्ये गुंतवणूक करणार आहे, ते देखील विचारा. त्या कॅटेगरीमध्ये मागच्या 5 वर्षाचा रिटर्न खूप जास्त असेल तर गुंतवणूक करू नका. ज्या वेळेला पास्ट परफॉर्मन्स खराब असतो, त्या वेळेला गुंतवणूक केली तर जास्त फायदा मिळतो हे लक्षात ठेवा. त्याच बरोबर, गुंतवणुकी संदर्भात माहिती देणारे मनी9 सारखे चॅनल नियमित पाहत राहा. तुमच्याकडे जर गुंतवणुकी संदर्भात नॉलेज असेल तर तुमची फसवणूक होणार नाही.

Published: April 12, 2024, 15:13 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App