मुंबईतल्या एका खासगी शाळेत नेहा शिक्षिका म्हणून काम करते. एका आयुर्विमा पॉलिसीची मुदत संपल्यामुळे तिच्या बचत खात्यात 5 लाख रुपये जमा झालेत. बचत खात्यातील पैशांवर केवळ 2.7% व्याज मिळतोय. नेहाला सध्या वर्षभर पैशांची गरज नाही. त्यामुळे आता या पैशाचे काय करावं ? यावरून ती गोंधळात पडलीय.
नेहाप्रमाणेच अनेक जणांच्या बचत खात्यात मोठी रक्कम असते. या बचत खात्यातील रक्कमेवर फक्त वार्षिक तीन टक्के दरानं व्याज मिळतो. तुमच्या बचत खात्यात मोठी रक्कम जमा असल्यास ऑनलाइन मुदत ठेव म्हणजेच FD करता येते.
एसबीआयसह सर्व बँका मोबाइल ऍप आणि वेबसाइटद्वारे ऑनलाइन एफडीची सुविधा देत आहेत. ऑनलाईन एफडी करून तुम्ही दुप्पटीहून अधिक उत्पन्न कमाऊ शकता. जवळपास सर्वच बँका 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत FD ची सुविधा देत आहेत.
ऑनलाइन FD कशी करावी ?
समजा नेहाचं बचत खाते SBI बँकेत आहे. ऑनलाईन एफडी करण्यासाठी नेहा बँकेच्या वेबसाइटवर किंवा योनो ऍपवर जाऊन ई-फिक्स्ड डिपॉझिटचा पर्याय निवडू शकते. गुंतवणुकीची रक्कम भरून एफडीचा कालावधी निवडा. त्यानंतर एफडीशी संबंधित अटी आणि नियम वाचा आणि सबमिट करा. अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीनं तु्म्हाला FD खातं उघडता येतं. नेट बँकिंगचा वापर करताना तुम्हाला एफडीचं वेगळं खातं दिसते. बहुतांश बँकांमध्ये ऑनलाईन पद्धतीनं एफडी करण्याची प्रक्रिया जवळपास सारखीच आहे.
नेहाने बचत खात्यात 5 लाख रुपये ठेवल्यास एका वर्षात 2.7 टक्के दरानं एकूण 13,637 रुपये मिळतील. SBI मध्ये सध्या एका वर्षाच्या FD वर 6.80 टक्के व्याज मिळतंय. नेहाने 1 वर्षाच्या एफडीमध्ये 5 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास एका वर्षाच्या मुदतीनंतर 34,877 रुपये व्याज मिळतो. बचत खात्याच्या तुलनेत एफडीतून नेहाला अडीच पट जास्त कमाई होत आहे. मोठ्या रक्कमेची एफडी केल्यास उत्पन्नही वाढते.
ऑनलाईन एफडीचे फायदे
ऑनलाइन FD केल्यास तुम्हाला पाहिजे त्यावेळी पैसे काढता येतात. बँकेत जाऊन एफडी केल्यास मुदतीपूर्वी पैशांची गरज भासल्यास बँकेच्या शाखेत जाऊन कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करावे लागतात. मात्र, पैशांची गरज पडल्यानंतर बँकेत न जाता ऑनलाइन एफडी तुम्हाला कधीही मोडता येतं.
चएफडी मोडल्यानंतर तुमच्या खात्यात पैसेदेखील लगेच जमा होतात. अनेक बँका FD मुदतीपूर्वी मोडल्यानंतरही दंड आकारत नाहीत. तुमची बँकेतही अशी सविधा देत असल्यास मग सोन्याहून पिवळं. तुमच्या खात्यात मोठी रक्कम आल्यास तुम्हालाही ऑनलाइन FD करता येते..
बँका FD वर OD म्हणजेच ओव्हरड्राफ्टची सुविधा देतात पैशांची गरज पडल्यास एफडी न तोडता तुम्हाला एफडीवर ओडीचा लाभ घेता येतो. त्यामुळे तुम्हाला एफडी तोडावी लागत नाही. गरजेनुसार तुम्ही बचत खात्याप्रमाणं OD मधून पैसे काढू शकता. तुम्हाला FD वर व्याज देखील मिळत राहतो. विशेष म्हणजे OD साठी तुम्हाला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही.एका क्लिकवर तुम्हाला घरबसल्या ओडी मिळतो.
एफडी सर्वात सुरक्षित गुंतवणूक
एफडी गुतंवणुकीचा लोकप्रिय आणि सुरक्षित पर्याय आहे. ऑनलाइन पर्याय उपलब्ध झाल्याने एफडीचे आकर्षण आणखी वाढलं आहे. तुम्हाला बँकेचा ऍप वापरता येत असल्यास तुम्हाला सहजपणे ऑनलाईन एफडी करता येते. ऑनलाईन एफडीमुळे तुम्हाला जास्त उत्पन्नही मिळते आणि गरजेच्या वेळी केव्हाही पैसे काढता येतात. एकूण ऑनलाईन एफडी करण्यात कोणतंही नुकसान नाही,फायदे मात्र खूप आहेत,असा सल्ला वैयक्तिक गुंतवणूक सल्लागार तज्ज्ञ बळवंत जैन यांनी दिलाय.
लहान रकमेची एफडी करा FD मुळे पोर्टफोलिओ चांगला होतो. एफडी ऑनलाइन पद्धतीनं केल्यास चिंतामुक्त कमाई करता येते. मोठी रक्कमेची एफडी करण्याऐवजी लहान-लहान भागांमध्ये एफडी करा. पैशांची गरज पडल्यास एखादी एफडी मोडून आर्थिक गरज पूर्ण करता येते. त्यामुळे तुमचं नुकसान होत नाही आणि उर्वरित एफडीवर व्याज मिळत राहतो.
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App