राहुल एका सायबर फ्रॉडचा बळी ठरलाय. सायबर भामट्यांनी त्याला पन्नास हजार रुपयांना फसवलंय. राहुलंनं लगेच सायबर पोलिसांकडे तक्रार केलीय तसेच बँकेशी संपर्क करून फसवणुकीची माहिती दिलीय आणि तक्रार दाखल केलीय. मात्र, बँकेनं या प्रकरणातून आपले हात झटकलेत आणि सर्व दोष राहुलवर टाकून दिला. राहुलनं अनेकदा या प्रकरणाचा बँकेसोबत पाठपुरावा केला. मात्र, बँकेने त्याच्या कोणत्याच तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर राहुलनं बँकेच्याविरोधात लोकपाल म्हणजेच ओम्बडसमनकडे तक्रार दाखल केली. राहुलप्रमाणेच इतर बँकेचे ग्राहकही बँकेच्याविरोधात लोकपालाकडे तक्रार दाखल करू शकतात. ही तक्रार बँकेच्या खराब सेवेबद्दल असू शकते.तसेच कर्ज परतफेडीसाठी वसुली एजन्टनं दिलेल्या त्रासाबद्ल असू शकते.
बँक लोकपालाकडे दिवसेंदिवस तक्रारींची संख्या का वाढत आहेत ? लोकपालाकडे कशी तक्रार करता येते ? हे पाहूयात.
बँकेशी संबंधित तुम्हाला एखादी अडचण आल्यास सुरूवातीला बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर फोन करून तक्रार दाखल करा. तरीही तक्रारीचे निवारण न झाल्यास बँकेत जाऊन ग्राहक अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करा. प्रत्येक बँकेकडे तक्रारीचं निवारण करण्यासाठी एक अधिकारी नियुक्त केलेला असतो. एका महिन्याच्या आत तक्रारीचं निवारण न झाल्यास तुम्ही बँकेच्या लोकपाल म्हणजेच ओम्बड्समनकडे तक्रार दाखल करू शकता. बँकेच्या लोकपालाकडे तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीनं तक्रार दाखल करू शकता.
ऑफलाईन म्हणजे लिखित स्वरूपात अर्ज देऊन तक्रार दाकल करू शकता. तरऑनलाईन तक्रारीसाठी cms.rbi.org.in या वेबसाईटवर जाऊन तक्रार दाखल करता येते. 2023 मधील एप्रिल ते जून आणि जुलै ते सप्टेंबर या दोन तिमाहीमध्ये कर्ज, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक बँकिंग सुविधा, क्रेडिट आणि डेबिट कार्डशी संबंधित सुमारे 60 टक्के तक्रारी बँकेच्या लोकपालाला प्राप्त झाल्या आहेत,अशी माहिती आरबीआयच्या अहवालातून मिळालीय. या तक्रारीतही कर्ज आणि गैर व्यवहाराशी संबंधित सर्वाधिक तक्रारी आहेत. बँकेला वसुली एजन्टची सुविधा घेताना नियमाचं पालन करावं असे स्पष्ट मार्गदर्शक सूचना आरबीआयनं जारी केलेत. वसुली अधिकारी कर्जदाराला त्रास देऊ शकत नाही,असंही आरबीआयनं स्पष्ट केलंय.
एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये वसुली अधिकाऱ्यांशी संबंधित 24 टक्के म्हणजेच जवळपास 16 हजार तक्रारी दाखल झाल्यात. तर जुलै ते सप्टेंबर दरम्यान सुमारे 23 टक्के 17 हजार तक्रारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांच्या विरोधात बँक लोकपालाला प्राप्त झाल्यात. 2023 मध्ये पहिल्या दोन तिमाहीमध्ये मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक बँकिंगबाबत सुमारे 18 आणि 16 टक्के तक्रारी दाखल झाल्यात. तर दुसरीकडे क्रेडिट कार्डशी संबंधित सुमारे 14 आणि 13 टक्के तक्रारी प्राप्त झाल्यात. एकूण 2023 मधील पहिल्या सहा महिन्यात बँकेच्या लोकपालाकडे एक लाख 44 हजार तक्रारी दाखल झाल्यात. बँकेच्या कारभारात सुधारणा आणि नियम कडक करण्याची किती गरज आहे दिवसेंदिवस वाढत चालेलेल्या तक्रारीच्या संखेवरून दिसून येते.
Published: January 22, 2024, 11:34 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App