म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरला किती कमिशन मिळतं?

म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरला नक्की किती कमिशन मिळतं, चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

अमितने 5 वर्षांपूर्वी म्युच्युअल फंड्समध्ये 5000 रुपयाची SIP चालू केली. त्याचा एक मित्र म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर आहे. मित्राने 2019 मध्ये SIP बद्दल माहिती दिली, इतर ऍसेटच्या तुलनेत म्युच्युअल फंड्समध्ये रिटर्न का जास्त मिळतो, ते समजावून सांगितलं. त्यानंतर, डिस्ट्रिब्युटरने अमितचं रिस्क प्रोफाईलींग केलं आणि त्याची जोखीम घेण्याची क्षमता आणि अपेक्षित रिटर्न यानुसार SBI ICICI कोटक, HDFC आणि पराग पारीख यांच्या प्रत्येकी एका फंडमध्ये 1000 रुपयाची SIP चालू करण्याचा सल्ला दिला. अमितने लगेच SIP चालू केली, कोविडचा क्रॅश आला त्यावेळेला डिस्ट्रिब्युटरने अमितच्या पोर्टफोलिओमध्ये अपेक्षित बदल केले. अमितच्या अनेक मित्रांनी घाबरून कोविडच्या क्रॅशमध्ये SIP बंद केली. मात्र, अमितचं हॅन्डहोल्डिंग करायला त्याचा डिस्ट्रिब्युटर होता, ही घाबरून पळून जाण्याची नाही तर आणखी जास्त जोखीम घेण्याची वेळ आहे, असं त्याने अमितला सांगितलं. कोविडच्या क्रॅशमध्ये अमितने डिस्ट्रिब्युटरचं ऐकून आणखी 1 लाख रुपयाची एकरकमी गुंतवणूक केली. मागच्या 5 वर्षात अमितला सरासरी 19% CAGR मिळाला आहे. सगळं सुरळीत चालू असताना एके दिवशी अमितला एका अँपची जाहिरात दिसली. डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा आणि लाखो रुपयाचं कमिशन वाचवा, या आकर्षक टॅगलाईनने अमितचं लक्ष वेधलं. माझ्या गुंतवणुकीवर डिस्ट्रिब्युटर लाखो रुपये कमावणार म्हंटल्यावर अमित अस्वस्थ झाला. अश्याच प्रकारच्या जाहिराती आपल्यापैकी अनेक गुंतवणूकदार पाहतात, आपलं लाखो रुपये वाचणार म्हणून डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. पण इथे एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरला नक्की किती कमिशन मिळतं, चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

मित्रांनो हे गणित समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. आपण SBI ब्ल्यूचिप फंडच्या डायरेक्ट आणि रेग्युलर प्लॅनच्या एक्सपेन्स रेशिओमध्ये किती फरक आहे, ते समजून घेऊया. SBI ब्ल्यूचिप फंड डायरेक्ट प्लॅनचा एक्सपेन्स रेशिओ आहे 0.86%, तर याच फंडच्या रेग्युलर प्लॅनचा म्हणजे जो फंड तुम्हाला डिस्ट्रिब्युटरकडून मिळणार हं त्याचा एक्सपेन्स रेशिओ आहे 1.55%. या दोन्हीमध्ये 0.69 टक्याचा फरक आहे, तेवढा फरक म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरची वार्षिक कामे आहे. समजा तुम्ही SBI ब्ल्यूचिप फंडमध्ये 1 लाख रुपयाची गुंतवणूक केली असेल, तर तुमच्या डिस्ट्रिब्युटरला त्या वर्षी साधारण 1 लाखाच्या 0.69% म्हणजे साधारण 690 रुपये कमिशन मिळेल. डिस्ट्रिब्युटरला इक्विटी फंड्सवर सरासरी 0.7% कमिशन मिळतं, तर हायब्रीड आणि डेट फंड्सवर अनुक्रमे 0.5 आणि 0.3% कमिशन मिळतं. असं गृहीत धारा कि तुमचा पोर्टफोलिओ 5 लाख रुपयाचा आहे, ज्यामध्ये इक्विटी, हायब्रीड आणि डेट फंड्सचा समावेश आहे. यावर सरासरी अर्धा टक्का जर तुमच्या डिस्ट्रिब्युटरला मिळाला तर त्याला तुमच्या गुंतवणुकीवर त्या वर्षी 2500 रुपये कमिशन मिळेल.

तुमच्याकडून डिस्ट्रिब्युटरला काय मिळालं याचा हिशोब झाला, आता डिस्ट्रिब्युटरकडून तुम्हाला काय मिळणार, त्याचा हिशोब बाकी आहे. तुमची जोखीम घेण्याची क्षमता, तुमचं उद्दिष्ट आणि मार्केटची कंडिशन बघून म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर फंडची निवड करतो. भारतात 44 पेक्षा जास्त म्युच्युअल फंड कंपन्या आहेत, त्यांच्याकडे एकूण 2000 पेक्षा जास्त फंड्स आहेत. स्मॉलकॅप, मिडकॅप, लार्जकॅप, बॅलन्स्ड एडव्हान्टेज, अग्रेसिव्ह हायब्रीड, PSU बॉण्ड, शॉर्ट टर्म बॉण्ड, ओव्हरनाईट यासारख्या असंख्य सब-कॅटेगरी म्युच्युअल फंड्समध्ये आहेत. यापैकी सध्याच्या मार्केट कंडिशनमध्ये तुमच्यासाठी कोणता फंड चांगला आहे, हे ठरवण्याचं काम डिस्ट्रिब्युटर करतो. तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायात बिझी असता तेव्हा तुमचा प्रतिनिधी म्हणून डिस्ट्रिब्युटर मार्केटवर लक्ष ठेऊन असतो. म्युच्युअल फंड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर, CEO फंड मॅनेजर आणि इतर सिनिअर अधिकाऱ्यांच्या तो संपर्कात असतो. फंड मॅनेजमेंट टीम आणि गुंतवणूकदार यांच्यातला दुवा म्हणजे डिस्ट्रिब्युटर असतो. त्याच्या एवढ्या सगळ्या प्रयत्नांसाठी आणि मेहनतीसाठी तुमच्या 5 लाखाच्या पोर्टफोलिओवर डिस्ट्रिब्युटरला वार्षिक 2500 रुपये देणं योग्य आहे का, हा निर्णय तुम्हाला स्वतःलाच घ्यावा लागेल.

मित्रांनो आपण आपल्या साफ सफाई करणाऱ्या मावशींना दर महिन्याला 1000 ते 2000 रुपये, म्हणजे वार्षिक 12 ते 24 हजार रुपये देतो. हॉटेलमध्ये दर वर्षी हजारो रुपये खर्च करतो, चांगले मोबाईल, ब्रँडेड कपडे खरेदी करतो. दर वर्षी काही आवश्यक तर काही अनावश्यक गोष्टींवर आपण लाखो रुपये खर्च करतो, पण आर्थिक सल्लागाराला आपल्यामुळे 2 5 हजार कमिशन मिळतं म्हंटल्यावर आपल्या पोटात दुखायला सुरुवात होते. गुगल आणि युट्युब बघून तुम्हाला माहिती मिळेल, पण योग्य सल्ला तुम्हाला अनुभवी आणि फुल टाइम सल्लागारच देऊ शकतो. आजारी पडल्यावर पैसे वाचवायचे म्हणून गुगलवर 4 आर्टिकल वाचून आणि 4 व्हिडीओ बघून तुम्ही डॉक्टरकडे न जाता स्वतःच स्वतःची ट्रीटमेंट करायची ठरवली तर काय होईल? पैसे वाचतील पण कदाचित जीव जाईल. हाच प्रकार गुंतवणुकीच्या बाबतीत आहे, 2 5 हजार वाचवायचे म्हणून सल्लागाराला बायपास करायचा प्रयत्न केला तर लाखाचे 12 हजार कधी होतील सांगता येणार नाही. तुम्ही फुल टाइम इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि पुरेसा अनुभव असेल तर डायरेक्ट फंड्समध्ये गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही. मात्र, तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी ट्रॅक करण्यासाठी वेळ आणि अनुभव नसेल, तर चांगल्या सल्लागाराची मदत घ्या. विचार बदल, पोर्टफोलिओ दशा नक्की बदलेल.

Published: April 23, 2024, 19:38 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App