FOREIGN TRIP - DEBIT CARD VS CREDIT CARD

परदेशात खर्च करायचा असेल तर डेबिट कार्ड खरंच फायद्याचे आहेत का, असा प्रश्न अमितला पडला आहे. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

अमित त्याच्या फॅमिलीसोबत सिंगापूरला जाणार आहे. त्याने विमानाचे तिकिटं आणि हॉटेलचं बुकिंग क्रेडिट कार्डवर केलं. सिंगापूरला गेल्यावर तिकडच्या खर्चासाठी आणि शॉपिंगसाठी क्रेडिट कार्डचा वापर करायचा अमितचा विचार होता. मात्र, त्याच्या मित्राने त्याला क्रेडिट कार्ड न वापरण्याचा सल्ला दिला. त्यापेक्षा, डेबिट कार्डचा वापर कर, असं अमितचा मित्र म्हणाला. पण परदेशात खर्च करायचा असेल तर डेबिट कार्ड खरंच फायद्याचे आहेत का, असा प्रश्न अमितला पडला आहे. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

डेबिट कार्ड वापरण्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्याकडे जेवढे पैसे आहेत त्याच्यापेक्षा जास्त आपण खर्च करू शकत नाही. त्यामुळे, अनावश्यक खर्च होण्याची शक्यता कमी असते. याउलट, क्रेडिट कार्डवर खूप जास्त लिमिट असेल तर विनाकारण खर्च होऊ शकतो. त्यामुळे, ट्रिपचा खर्च बजेटपेक्षा जास्त होण्याची भीती असते. तसेच, परदेशातल्या ATM मधून डेबिट कार्ड वापरून पैसे काढले तर कमी शुल्क द्यावं लागतं. डेबिट कार्ड वापरून पैसे काढले तर साधारण 150 ते 200 रुपयाची फ्लॅट फी भरावी लागते. या उलट, क्रेडिट कार्ड वापरून ATM मधून पैसे काढले तर एकूण रकमेच्या साधारण साडे तीन टक्के कॅश एडव्हान्स फी भरावी लागते. तसेच, पहिल्या दिवसापासून पूर्ण रकमेवर व्याज भरावं लागतं, याचा व्याजदर 40 ते 50% असू शकतो. त्यामुळे, क्रेडिट कार्डचा वापर करून ATM मधून पैसे काढले तर ते बऱ्यापैकी महागात पडू शकतं. त्यामुळे, कोणताही खर्च करताना डेबिट आणि क्रेडिट कार्डवर किती शुल्क लागेल, याची सविस्तर माहिती घेऊनच व्यवहार केला पाहिजे.

फॉरेन ट्रीपला गेल्यावर काही ठिकाणी क्रेडिट कार्ड वापरलं तर अधिक फायदा होतो. उदारणार्थ, तुम्हाला विमानाचं तिकिटं बुक करायचं असेल, आणि तुमच्या क्रेडिट कार्डवर आकर्षक रिवॉर्ड पॉईंट मिळणार असतील, तर क्रेडिट कार्डचा वापर केला पाहिजे. तसेच, क्रेडिट कार्डवर 40 ते 50 दिवस बिनव्याजी पैसे वापरता येतात. त्यामुळे, रिवॉर्ड पॉईंट्स आणि 50 दिवस बिनव्याजी पैसे मिळणं, असा दुहेरी फायदा क्रेडिट कार्डवर मिळतो. एकंदरीत विचार केल्यास, तुम्ही फॉरेन ट्रीपला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर डेबिट आणि क्रेडिट कार्ड या दोन्हीचा वापर करा. यामुळे, तुम्हाला जास्त शुल्क भरावं लागणार नाही आणि दोन्हीचे फायदे मिळतील.

Published: January 5, 2024, 16:01 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App