इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी घर खरेदी करावं का?

तुम्हाला जर टॅक्स लायबिलिटी बऱ्यापैकी कमी करायची असेल, तर घर खरेदी करणं हा चांगला पर्याय आहे?

दिनेश आणि उत्सव टॅक्स प्लॅनिंगवर चर्चा करत होते. दिनेशने PPF , लाईफ इंश्युरन्स, ELSS फंड्समध्ये एकूण दीड लाख रुपयाची गुंतवणूक केली. सेक्शन 80 C अंतर्गत टॅक्स डिडक्शन क्लेम केल्यावर काही टॅक्स भरावा लागणार नाही, असं दिनेशला वाटत होतं. मात्र तरी त्याला 22000 रुपये टॅक्स भरावा लागला. टॅक्स वाचवण्यासाठी आणखी काही मार्ग आहे का, असं तो उत्सवला विचारतो. टॅक्स वाचवण्यासाठी 80 C व्यतिरिक्त आणखी बरेच मार्ग आहेत, असं उत्सव त्याला सांगतो.

केंद्र सरकारने आता नवीन टॅक्स पद्धतीचा पर्याय दिला आहे. वर्षाला 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे बरेच लोकं नवीन टॅक्स रेजिम निवडतात, मात्र अजूनही बरेच करदाते जुन्याच कर पद्धतीला पसंती देतात. जुन्या टॅक्स रेजिम अंतर्गत टॅक्स बचावता येतो आणि गुंतवणुकीची सवय लागते. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, लाईफ इंश्युरन्स, PPF, टॅक्स सेविंग फंड्स, होम लोन प्रिन्सिपलसारखे खर्च किंवा गुंतवणूक दाखवून टॅक्सेबल इन्कम कमी करता येतो. मात्र, बऱ्याच लोकांचं 80C चा कोटा पूर्ण होतं, मात्र त्या व्यतिरिक्त आणखी कुठे गुंतवणूक करून आणखी टॅक्स वाचवता येईल, ते जाणून घेणं महत्वाचं आहे. 80 C व्यतिरिक्त टॅक्स वाचवण्याचे आणखी कोणते मार्ग आहेत, ते आता जाणून घेऊया.

तुम्हाला जर टॅक्स लायबिलिटी बऱ्यापैकी कमी करायची असेल तर घर खरेदी करणं हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. होम लोनच्या प्रिन्सिपल रिपेमेंटवर सेक्शन 80 C अंतर्गत दीड लाख रुपयाचं डिडक्शन क्लेम करता येतं. जर आपण घर खरेदी केलं आणि दर वर्षी आपल्या EMI मधून आपण दीड लाख रुपयाचं प्रिन्सिपल रिपे केलं तर सेक्शन 80 C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळवता येतो. त्याच बरोबर, आपण होम लोनवर जे व्याज भरतोय, त्यावर आपण सेक्शन 24 B अंतर्गत वार्षिक 2 लाखापर्यंत टॅक्स बेनिफिट मिळवू शकतो. जर दिनेशने होम लोन घेऊन घर खरेदी केलं तर त्याचा दर वर्षी टॅक्स वाचेल, प्रॉपर्टीची किंमत किती वाढेल आणि एकंदरीत या निर्णयाचा त्याला खरंच फायदा होईल का, ते जाणून घेऊया.

समजा दिनेशने पुण्यातल्या हिंजवडी भागात 2 BHK फ्लॅट खरेदी केला तर 60 लाखात त्याला चांगला 2 BHK फ्लॅट मिळेल. घर खरेदी करण्याचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे पहिल्या वर्षी तो स्टॅम्प ड्युटीवर सेक्शन 80 C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळवू शकतो. दिनेशने 10 लाख रुपये डाउनपेमेंट केलं आणि 50 लाख रुपयाचं होम लोन 16 वर्षाच्या कालावधीसाठी घेतलं तर 8 .4 % वार्षिक व्याजदरानुसार त्याला दर महिन्याला 47400 रुपये EMI भरावा लागेल. 16 वर्षाचं होम लोन घेतल्यामुळे दिनेशला प्रिंसिपलवर दीड लाख आणि व्याजावर 2 लाख असा पूर्ण टॅक्स बेनिफिट मिळवता येईल. आपण 3 % रेंटल यिल्ड गृहीत धरलं तरी 60 लाखाच्या प्रॉपर्टीवर दिनेशला वार्षिक 1 लाख 80 हजार रुपये किंवा दर महिन्याला 15000 रुपये रेंट मिळेल. आता घर खरेदी करून दिनेशचा किती इन्कम टॅक्स वाचेल ते जाणून घेऊया. समजा दिनेशचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये असेल, तर 80 C चे दीड लाख आणि इंटरेस्ट चे 2 लाख असे 2 डिडक्शन घेतले तर त्याचा टॅक्सेबल इन्कम 5 लाखाच्या खाली जाईल. त्यामुळे, जुन्या टॅक्स रेजिम अंतर्गत कोणताही इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. त्याने कोणतंच डिडक्शन क्लेम केलं नसतं तर त्याला वर्षाला साधारण 72000 रुपये म्हणजेच महिन्याला 6000 रुपये टॅक्स भरावा लागला असता.

दिनेशचा EMI आहे 47400 रुपये, त्याला दर महिन्याला रेंट मिळेल 15000 रुपये आणि टॅक्सची बचत होईल साधारण 6000 रुपयाची, म्हणजे त्याला नेट EMI केवळ 26400 रुपये भरावा लागेल. आता 16 वर्षानंतर प्रॉपर्टीचं मूल्य किती होईल, ते जाणून घेऊया. रिअल इस्टेटच्या किमती साधारण महागाईच्या दराने वाढतात, असं ऐतिहासिक आकडेवारीतून लक्षात येतं. त्यामुळे, पुढचे 16 वर्ष दिनेशच्या फ्लॅटची किंमत दर वर्षी 7 टक्याने वाढली तर सोळाव्या वर्षी फ्लॅटची किंमत असेल साधारण 1 कोटी 77 लाख रुपये. दिनेशने सुरुवातीला 10 लाख रुपये डाउनपेमेंट केलं आणि पुढचे 16 वर्ष नेट 26400 रुपये EMI भरला. आता या गुंतवणुकीचा IRR किती येतो ते जाणून घेऊया. पहिल्या वर्षी त्याला 10 लाख रुपये डाउनपेमेंट आणि त्या वर्षीचा नेट EMI म्हणजे 26400 गुणिले 12 महिने, असे एकूण 13 लाख 16 हजार रुपये भरावे लागतील. तिथून पुढे दर वर्षी 3 लाख 17 रुपये EMI म्हणून भरावे लागतील. 17 व्या वर्षी त्याच्या फ्लॅटची किंमत 1 कोटी 77 लाख रुपये झाली तर त्याला 10 .30 % वार्षिक रिटर्न मिळाला, असं म्हणता येईल. प्रत्येक्षात हा रिटर्न 12 टक्यापेक्षा जास्त असेल, कारण भविष्यात व्याजदर कमी होतं जातील आणि रेंट वाढत जाईल. एकंदरीत विचार केल्यास, टॅक्स वाचवण्यासाठी फ्लॅट खरेदी करण्यात आपला नक्कीच फायदा आहे.

दिनेशप्रमाणे तुम्ही देखील या वर्षी टॅक्स भरला असेल पण पुढच्या वर्षी तो वाचवायचा असेल तर या डिडक्शनचा नक्की फायदा करून घ्या. सगळ्यात आधी जुनी आणि नवीन यापैकी नक्की कोणती टॅक्स रेजिम आपल्या फायद्याची आहे, ते समजून घ्या. जर जुनी टॅक्स रेजिम निवडून तुमची टॅक्सची जास्त बचत होतं असेल, तर जास्तीतजास्त डिडक्शन क्लेम करण्याचा प्रयत्न करा आणि टॅक्स वाचवा. नवीन आर्थिक वर्ष आत्ताच चालू झालं आहे त्यामुळे आता शांततेत टॅक्स प्लॅनिंग केलं तर टॅक्स वाचवता येईल.

Published: April 5, 2024, 16:59 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App