IPO प्रॉफिटवर किती टॅक्स भरावा लागतो

आपल्याला कुठून ही पैसे मिळाले कि त्यावर टॅक्स हा भरावाच लागतो. IPO तुन मिळालेल्या प्रॉफिटवर किती टॅक्स भरावा लागतो, ते आता जाणून घेऊया.

अजित आणि राहुल या दोघांनाही भारती हेक्साकॉमचा IPO मिळाला. बऱ्याच महिन्यांनंतर IPO ची एलॉटमेंट मिळाली आणि चांगला लिस्टिंग गेन मिळाला म्हणून दोघेही खुश होते. काही न करता 1 आठवड्यात 32% लिस्टिंग गेन मिळाल्यामुळे त्यांना एका लॉटवर साधारण 5000 रुपयाचा प्रॉफिट मिळाला. आता मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे 2 दिवस महाबळेश्वरला फिरायला जाऊ, असा त्यांनी प्लॅन केला. IPO मधून मिळालेल्या प्रॉफिटमध्ये पूर्ण ट्रिप होणार, म्हणून त्यांचा आनंद द्विगुणित झाला. ठरल्या प्रमाणे ते महाबळेश्वरला जाऊन आले. नंतर अजितने एक आर्टिकल वाचलं ज्यामध्ये IPO तुन मिळालेल्या लिस्टिंग गेन वर इन्कम टॅक्स भरावा लागतो, असं लिहिलं होतं. मिळालेला सगळं प्रॉफिट आपलाच आहे म्हणून दोघांनीही सगळे पैसे ट्रिपमध्ये खर्च करून टाकले, आता खिशातून टॅक्स भरावा लागणार म्हंटल्यावर अजित आणि राहुलला टेन्शन आलं आहे.

2023 आणि 2024 मध्ये भारतात अनेक IPOs चं लिस्टिंग झालं. याआधीदेखील भारतात अनेक चांगले IPO आले आहेत, मात्र 2022 नंतर जे IPO लॉन्च करण्यात आले त्याचा भारतातल्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा झाला आहे. 2020 नंतर अनेक नवीन गुंतवणूकदारांनी डिमॅट अकॉउंट उघडून शेअर मार्केटमध्ये एंट्री केली. बरेच गुंतवणूकदार तर असे आहेत ज्यांनी केवळ IPO साठी शेअर मार्केटमध्ये एंट्री केली आहे. IPO एलॉट होण्याची शक्यता वाढावी म्हणून अनेकांनी घरातल्या मेम्बर्सच्या नावाने डिमॅट अकॉउंट उघडले आहेत. एकपेक्षा जास्त डिमॅटमधून IPO साठी अर्ज केला तर एलॉटमेंट मिळण्याची शक्यता वाढते. विशेष म्हणजे 2023 मध्ये ज्या कंपन्यांनी IPO लॉन्च केला त्यापैकी बऱ्याच कंपन्या फंडामेंटली अतिशय मजबूत होत्या. यामध्ये टाटा टेक्नॉलॉजीस, इर्डा आणि सायंट DLM सारख्या कंपन्यांचा समावेश होता. गुंतवणूकदारांची संख्या अनेक पटींनी वाढल्यामुळे सगळेच IPO अनेक पटींनी ओव्हर सबस्क्राईब झाले. त्यामुळे, लिस्टिंग गेनदेखील मजबूत मिळाला. खूप जास्त ओव्हर सबस्क्राईब झाल्यामुळे, गुंतवणूकदारांना काही ठराविक IPO मध्ये एलॉटमेंट मिळाली, मात्र जे शेअर्स एलॉट झाले त्यामध्ये चांगला प्रॉफिट मिळाला. विशेष म्हणजे, या IPOs नी चांगला लिस्टिंग गेन तर दिलाच, पण या शेअर्समध्ये लिस्टिंगनंतर देखील चांगली तेजी पाहायला मिळाली. IREDA चा शेअर 62 रुपयाला लिस्ट झाला आता तो 180 रुपयाच्या वर ट्रेड करतोय. हाच प्रकार सेन्को गोल्ड, नेट वेब टेक्नॉलॉजीस आणि सिग्नेचर ग्लोबलसारख्या अनेक शेअर्समध्ये पाहायला मिळाला. आपल्याला कुठून ही पैसे मिळाले कि त्यावर टॅक्स हा भरावाच लागतो. IPO तुन मिळालेल्या प्रॉफिटवर किती टॅक्स भरावा लागतो, ते आता जाणून घेऊया.

IPO तुन मिळालेल्या प्रॉफिटवर आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. मात्र, यामध्ये होल्डिंग पिरिअड कॅल्क्युलेट करताना आपली चूक होऊ शकते. आपण ज्या दिवशी गुंतवणूक केली टी तारीख गृहीत धरली तर आपली चूक होईल. ज्या दिवशी कंपनी आपल्याला शेअर्स इश्यू करेल, ती इश्यू डेट आपली गुंतवणुकीची तारीख असेल. त्यानंतर, आपण 1 वर्षाच्या आत प्रॉफिट बुक केला तर आपल्याला प्रॉफिटवर 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. 1 वर्षानंतर प्रॉफिट बुक केला आणि त्या आर्थिक वर्षात आपला लॉन्ग टर्म कॅपिटल गेन 1 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यावर आपल्याला 10% LTCG टॅक्स भरावा लागेल. इथे एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे तो म्हणजे जोपर्यंत आपण शेअर्स विकत नाही, तोपर्यंत आपल्यावर टॅक्स लायबिलिटी येणार नाही. त्यामुळे, शक्यतो IPO तुन मिळालेले शेअर्स खरेदी करू नका. कंपनी जर चांगली असेल तिचा व्यवसाय वाढत जाईल आणि लॉन्ग टर्ममध्ये आपली चांगली वेल्थ क्रिएट होईल. जर आपण शेअर्सची विक्री केली तर मात्र होल्डिंग पिरिअडनुसार आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल.

Published: May 9, 2024, 14:22 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App